Join us

कर्करोगावर मात केल्यानंतर शरद पोंक्षे वळले या क्षेत्राकडे, पहिल्यांदाच करणार हे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 3:55 PM

शरद पोंक्षे यांना दोन वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. शरद पोंक्षे यांनी औषधोपचार आणि किमो थेरेपी घेऊन कर्करोगावर यशस्वीपणे मात केली.

ठळक मुद्देशरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही वेबसिरीज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे.

प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आणखी एका नवीन वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा आज मुंबईत शुभारंभ झाला. यापूर्वीच प्लॅनेट मराठीच्या काही वेबसिरीजची नावे घोषित करण्यात आली होती त्यात आता आणखी एका वेबसिरीजची भर पडणार आहे. मात्र या वेबसिरीजचे नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी यातील कलाकारांची नावे मात्र जाहीर करण्यात आली आहेत. शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही वेबसिरीज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे. 

सहा भागांची ही वेबसिरीज एक कौटुंबिक कथा असून ही वेबसिरीज बघताना हे कुठेतरी आपल्याही घरात घडतंय, याची प्रेक्षकांना जाणीव होईल आणि त्यामुळेच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी टीमला खात्री आहे. शरद पोंक्षे यांना दोन वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. शरद पोंक्षे यांनी औषधोपचार आणि किमो थेरेपी घेऊन कर्करोगावर यशस्वीपणे मात केली. आता या वेबसिरीजच्या निमित्ताने शरद पोंक्षे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. 

या वेबसिरीजबद्दल प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर सांगतात, ''आजवर हाताळलेल्या विषयांपेक्षा हा जरा वेगळाच विषय आहे. ही वेबसिरीज प्रेक्षक आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडू शकतात. ही सिरीज ज्या विषयावर आधारित आहे, तो विषय खरोखरच गंभीर होता. मात्र तरीही आम्ही या गंभीर विषयाला विनोदाची जोड देत, अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. अभिनयात पूर्ण मुरलेले कलाकार असल्याने या सर्व जणांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.'' 

वर्जिनोशन्सची प्रथम निर्मिती असणाऱ्या या वेबसिरीजचे दिग्दर्शन अमित कान्हेरे यांचे असून योगेश विनायक जोशी यांनी संवादलेखन केले आहे. तर प्रतीक व्यास, अमित कान्हेरे यांनी निर्मिती केली आहे. विशाल संगवईने डीओपीचे काम पाहिले असून ओंकार महाजन क्रिएटीव्ह प्रोड्युसर आहेत. रोहन-रोहन यांनी या वेबसिरिजला संगीत दिले आहे.

टॅग्स :शरद पोंक्षे