Join us

विजय पाटकर यांना पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करताना पाहून गहिवरला शार्दूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 8:00 AM

विजय पाटकर यांना नाटकात पाहण्याची माझी  बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती ती आता पूर्ण झाली.'असे उद्गार शार्दूलने आपल्या बाबांविषयी काढले.     

स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' या धम्माल विनोदी नाटकाचा वारू आता चांगलाच उधळला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचा दौरा सुरु होणार आहे, गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर कॉमेडी किंग जॉनी लिव्हरच्या हस्ते श्रीगणेशा झालेल्या 'दहा बाय दहा' या नाटकाद्वारे विजय पाटकर यांनी तब्बल २० वर्षानंतर मराठी रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. त्यामुळे विनोदाच्या बादशहाला पुनश्च पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक नाटगृहात गर्दी करत आहे. विशेष म्हणजे, या नाटकाच्या निमित्ताने विजय पाटकरांचा मुलगा शार्दूल विजय पाटकर याने पहिल्यांदाच आपल्या वडिलांना रंगभूमीवर काम करताना पाहिले आहे. 

कारण, आतापर्यंत त्याने आपल्या बाबांना हिंदी व मराठीच्या छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर काम करताना पाहिले होते. त्यामुळे, बाबांना नाटकात काम करताना पाहण्याची त्याला भरपूर इच्छा होती. विजय पाटकर देखील मराठी नाटकात पुन्हा परतण्यासाठी उत्सुक होते, आणि योगायोगाने अनिकेत पाटील दिग्दर्शित 'दहा बाय दहा' हे नाटक त्यांना चालून आले. ''मला बाबांना रंगभूमीवर पाहताना खूप भरून आले. लहानपणापासून त्यांना सिनेमात आणि मालिकांमध्ये मी पाहिले आहे. मात्र रंगभूमीवरील त्यांचा अभिनय मी पहिल्यांदाच पाहिला. नाटक पाहताना एकीकडे त्यांच्या पंचवर मी खळखळून हसलो तर दुसरीकडे त्यांच्या इमोशनल डायलॉग्जवर मी भावुकदेखील झालो. त्यांना नाटकात पाहण्याची माझी  बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती ती आता पूर्ण झाली.'असे उद्गार शार्दूलने आपल्या बाबांविषयी काढले.     

शार्दूल पाटकरच नव्हे तर आजची युवा पिढीदेखील त्यांना पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करताना पाहत असल्यामुळे, कॉलेज तरुणाईदेखील 'दहा बाय दहा' नाटकाकडे वळताना दिसून येत आहे. मध्यमवर्गीय चौकट तोडण्यास भाग पाडणारं हे नाटक लोकांना विनोदी ढंगात नवीप्रेरणा देऊन जातं.

टॅग्स :विजय पाटकर