गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सोशल मीडियावर एक पोस्ट पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये एक आजोबा पिशव्या विकताना दिसत असून या आजोबांना पैशांची गरज असून त्यांच्याकडून तुम्ही पिशव्या नक्की घ्या अशा आशयाची पोस्ट गेल्या काही दिवसांपासून फिरत होती. ही पोस्ट शशांक केतकरने देखील फेसबुकवर शेअर केली होती.
शशांकने या पोस्टमध्ये लिहिले होते की, सकाळी सकाळी हा फोटो बघून भरून आलं.. वाईट वाटलं, आनंद झाला, राग आला पण सरते शेवटी या जगात आपण आलो आहोत तर जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी काहीतरी काम करत राहण्याशिवाय पर्याय नाही हेही जाणवलं... माहित चा पाठपुरावा केला नाहीये... पण तरीही ही पोस्ट शेअर करतो आहे. हे जोशी आजोबा, वय वर्ष 87, हे आजोबा गाद्यांच्या दुकानातून पडदा, सोफा यांच्या कव्हरचे उरलेले तुकडे दुकानदारांकडून विकत घेऊन कापडी पिशव्या स्वतः घरीच शिवतात. उदरनिर्वाहासाठी याही वयात त्यांना हे करावे लागते.... 40 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आजोबांकडे पिशव्या आहेत.आजोबा दर सोमवारी डोंबिवलीच्या गावदेवी मंदिरासमोर आणि गुरुवारी फडके रोडवर बसतात... ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून एक/दोन पिशव्या तरी जरूर घ्या...
शशांक केवळ ही पोस्ट शेअर करून गप्प बसला नाही तर त्याने या गोष्टीचा पाठपुरावा करायचे ठरवले. त्याने डोंबिवलीतील या आजोबांचा पत्ता शोधला आणि तो थेट त्यांच्या घरी पोहोचला. शशांकने नुकतेच एक युट्युब चॅनेल काढले आहे. या युट्युब चॅनेलवर त्याने त्या आजोबांची मुलाखत घेऊन त्यांची बाजू सगळ्यांसोर मांडली.
शशांकमुळे या आजोबांची खरी कथा सगळ्यांना कळली आहे. या आजोबांचे नाव सिद्धेश्वर जोशी असून हे आजोबा गरज असल्यामुळे नव्हे तर हातपाय चालते राहावेत यासाठी हा पिशवी बनवण्याचा व्यवसाय करतात. पिशव्या बनवणे ही त्यांची आवड असून ते यासाठी उल्हासनगरवरून कापड घेऊन येतात आणि घरी असलेल्या इलेक्ट्रीक मोटर मशिनवर पिशव्या शिवतात. त्यांचे मुलगा आणि मुलगी दोघेही त्यांच्याकडे व्यवस्थितपणे पाहातात. केवळ त्यांच्या हौसेखातर ते हा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.