Join us

​ती फुलराणी या नाटकाचे 100 प्रयोग लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 11:02 AM

ती फुलराणी हे नाटक अनेक वर्षांपूर्वी भक्ती बर्वे यांनी सादर केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ...

ती फुलराणी हे नाटक अनेक वर्षांपूर्वी भक्ती बर्वे यांनी सादर केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांच्यानंतर अनेक वर्षांनी फुलराणीच्या भूमिकेत आपल्याला अमृता सुभाषला पाहायला मिळाले होते. अमृताने देखील या भूमिकेला योग्य न्याय दिला होता. या भूमिकेमुळे अमृतालादेखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. काही वर्षांपूर्वी नव्या कलाकारांसोबत ती फुलराणी हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले. सध्या फुलराणी हे नाटक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असून या नाटकात हेमांगी कवी फुलराणीची भूमिका साकारताना दिसत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून हे नाटक 100 व्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे. ती फुलराणी हे नाटक सध्या सगळीकडेच हाऊसफुल सुरू आहे. या नाटकाचा 100 वा प्रयोग मुंबईत होणार असून शंभराव्या प्रयोगाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या शंभराव्या प्रयोगाला या नाटकाच्या टीमला मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे कळतेय. या नाटकाची निर्मिती लीना जुवेकर आणि राहुल जुवेकर यांनी केली आहे.ती फुलराणीची भुरळ आतापर्यंत अनेक पिढीतील दिग्दर्शक निर्मात्यांनी पडली आहे. राजेश देशपांडे यांनी या ती फुलराणीचे दिग्दर्शन केले असून या नाटकाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ती फुलराणी या नाटकात हेमांगी कवी सोबत विजय पटवर्धन, सुनील जाधव, रसिका धामणकर, अंजली मायदेव, दिशा दानडे, हरिश तांदळे, मिनाक्षी जोशी, निरंजन जावीर, नितीन नारकर, प्रांजल दामले आणि डॉ. गिरिश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.