मराठी चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता शेखर फडकेनेगणेशोत्सवातील आठवणींना उजाळा देताना त्याचे एक गुपित सांगितले आहे. तो म्हणाला की माझे पाळण्यातील नाव मोरेश्वर आहे.
शेखर म्हणाला की, मी वयाने कितीही मोठा झालो तरी मी बाप्पाच म्हणतो. हसतील बरेच जण पण मी लहानांसारखा बाप्पाच म्हणेन. कारण मला मी अजून मोठा झालो आहे असे वाटतच नाही. एक गुपित सांगतो आज माझे पाळण्यातले नाव मोरेश्वर आहे. तो पुढे म्हणाला की, माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात गणेशोत्सवापासूनच झाली. आमच्या सोसायटीमध्ये पाच दिवसांचा गणपती असतोय. स्टेज बांधला जातो. तिथे कार्यक्रमांमध्ये बालपणी मी आवर्जून भाग घ्यायचो. काही गंभीर आणि जास्त विनोदी अनेक स्वगते तिथे सादर केली. तिथेच मला खरा प्रेक्षक वर्ग मिळाला, आत्मविश्वास वाढला आणि ह्या क्षेत्रात येण्याचे निश्चित केले. नाटकाच्या निमित्ताने गणपती दिवसातले अनेक दौरे अनेक ठिकाणी केले. जास्त करून गोव्यात दौरे केले आहेत. गणपतीचा दौरा असला म्हणजे खूप छान वाटायचे. अनेक ठिकाणाच्या बाप्पाचे दर्शन व्हायचे. प्रसाद खायला मिळायचा. विघ्नहर्ता असल्यामुळे मी त्याच्याकडे सगळ्यांची दुःख दूर होवोत अशी प्रार्थना नेहमी करतो.माझ्या फडके घराण्याचा गणपती पूर्वी पेणला असायचा. सगळी भावंडे जमायची आणि धमाल करायची. एकत्र गप्पा, गाणी आणि होम मेड आईस्क्रीमवर ताव मारायचो. पण ते दिवस गेले. सगळ्यात वाईट गोष्ट ही की घराण्याचा बाप्पा (घरातल्या मोठ्या आणि समंजस मोठ्या माणसांमुळे) विभागला गेला त्यासाठी मी बाप्पावर अजून रुसलो आहे. आता मी काकांकडे ( कल्याणच्या ) बाप्पाच्या दर्शनाला जातो, असे शेखर सांगत होता. इतरांना त्रास होईल असा बाप्पाचा सण साजरा करू नका असे आवाहनदेखील त्याने यावेळी केले.