Join us

जिंकलंस मित्रा! वेटरचं काम ते राष्ट्रीय पुरस्कार; सांगलीच्या पठ्ठ्याचा संघर्षमय प्रवास

By संतोष कनमुसे | Published: August 25, 2023 6:00 PM

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड सारख्या छोट्या गावातून शेखर रणखांबे आज राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचले आहेत.

६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली. यात आपल्या सांगली जिल्ह्यातील 'पेड'सारख्या गावातील शेखर रणखांबे याच्या 'रेखा'या शॉर्ट फिल्मला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरीचा पुरस्कार मिळालाय. शेखर ज्या गावात राहतो ते  'पेड' हे गाव तासगाव तालुक्यातील दुष्काळ परिसरातील. शेखरचा या गावातून सुरू झालेला प्रवास आज दिल्लीपर्यंत पोहोचलाय. त्याचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. 

काही दिवसांपूर्वीच वडील गेले, आता राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा; पंकज त्रिपाठी भावुक

पेड या गावातच शेखर लहानाचा मोठा झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणी होत्या. शेखरचे वडील आजही मजुरी करतात. कसंबसं शेखरने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. यानंतर पुढचं शिक्षण घेता येणार नाही, म्हणून त्याने अहमदनगर येथे एका हॉटेलमध्ये वेटरचं कामं करण्यास सुरुवात केली. हॉटेलच्या कामात  त्याचं मन रमत नव्हतं. आपण पुढचं शिक्षण घेतले पाहिजे म्हणून त्याने पुन्हा आपलं गाव गाठलं आणि बारावी पूर्ण केली. यापुढे आता घरचे शिक्षणासाठी खर्च करणार नाहीत, आपल्याला आता नोकरीच करावी लागणार म्हणून शेखरने मुंबईची वाट धरली. 

मुंबईत शेखरचे चुलते अगोदरपासूनच कामासाठी आले होते. चुलत्यांसोबत त्याने काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्याने गवंड्याचे काम केले. शेखरला अगोदरपासूनच चित्रपटाची जास्त आवड होती. मुंबईत आल्यानंतर त्याची ओळख नाटक, एकांकिकेत काम करणाऱ्या टीमसोबत ओळख झाली. याच काळात शेखरला चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची दिशा खुणावत होती. या क्षेत्रात त्याच्या ओळखीही वाढल्या. सुरुवातीपासूनच तो दादा कोंडके आणि राज कपूर यांचे चित्रपट पाहत होता. मुंबईत एकांकिका करत असताना त्याचं वाचन वाढलं.

लघुपटास सुरुवात 

मुंबईत एकांकिका, नाटकात काम मिळाल्यानंतर त्याला पहिला लघुपट करण्याचा अनुभव मिळाला. या दरम्यान त्याने 'धोंडा' हा लघुपट बनवला. या लघुपटासाठी पैसे मिळत नसल्याने त्याने गावातच हा लघुपट बनवायचं ठरवलं. यासाठी त्याने गावातील लहान मुलांना काम दिलं. यामुळे कमी पैशात त्याचा पहिला लघुपट तयार झाला. पहिल्या लघुपटानंतर शेखरने मागे वळून पाहिलंच नाही. यानंतर त्याने मूक, पंजाबी ड्रेस, पॅम्पलेट, चिमणराव, रेनवॉटर असे लघुपट बनवले. शेखरचा पॅम्पलेट हा लघुपट थेट गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलपर्यंत पोहोचला. याच लघुपटाने त्याला ओळख दिली. 

'रेखा' लघुपटाला मिळालं मोठं यश

शेखरच्या अगोरच्या लघुपटाला मिळालेल्या यशानंतर शेखर मराठी चित्रपट निर्माते रवी जाधव यांच्या संपर्कात आला. यानंतर त्याने त्यांच्या सहाय्याने 'रेखा' ही शॉर्टफिल्म साकारली. ही शॉर्टफिल्म रस्त्यावर राहणाऱ्या महिलांच्या समस्यांवर आधारित आहे.  दिग्दर्शक शेखर रणखांबे यानं सांगलीतील काही कलाकारांना घेऊन सांगलीतील परिसरात चित्रीकरण करून 'रेखा' या फिल्मचा जगभर डंका गाजविला आहे. या लघुपाटतही त्याने सांगलीतील कलाकारांना संधी दिली आहे. त्या लघुपटाची गोव्यातील इफ्फी येथे निवड झाली. पुणे येथील आरोग्य फेस्टिवल, द एम्प्टी फिल्म फेस्टीवल, अक्षर मानव लघुपट महोत्सव, अरुणोदय फिल्म फेस्टिव्हल अहमदनगर, प्रतिबिंब फिल्म फेस्टीव्हल, लोकराजा राष्ट्रीय लघुपट महोत्सव असे अनेक महोत्सव या शॉर्टफिल्मनं गाजवलेत. 

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना शेखर म्हणतो, "६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. यात आमच्या 'रेखा'या शॉर्ट फिल्मला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरीचा पुरस्कार मिळालाय. मिळालेले यश पाहून आनंद वाटतोय. या लघुपटासाठी चित्रपट निर्माते रवी जाधव सर आणि मेघना जाधव यांनी पूर्ण सहकार्य केलं.  त्यांच्यामुळे आम्ही हा लघुपट करू शकलो आणि एवढं मोठं यश मिळवू शकलो."

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018मराठी चित्रपटरवी जाधव