संजय घावरे
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कित्ता गिरवत नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावरही दुसऱ्या अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. वर्तमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना बाजूला सारून काही संचालकांनी सुशांत शेलार यांची नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे महामंडळातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महामंडळाच्या कार्यकारीणीतील काही संचालकांनी नुकतीच कोल्हापूरमध्ये सभा घेऊन अभिनेता सुशांत शेलारला नवीन अध्यक्ष घोषित केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. ७ मे २०२१ रोजी जुन्या कार्यकारीणीचा कार्यकाल संपला असून, एक वर्ष लोटले तरी निवडणूक घेण्यात आली नसल्याने अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे. यावर सुशांत आणि मेघराज आपापल्या परीने मतप्रदर्शन करीत असल्याने दोन अध्यक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या सर्व गदारोळात महामंडळासमोरील प्रमुख प्रश्न अनुत्तरीत राहिले असून, निर्मात्यांना भेडसावणाऱ्या समस्या, मराठी चित्रपटांच्या अनुदानाच्या मुद्द्यांसह इतर बरीच कामांकडे दुर्लक्ष होत आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुशांतने घडलेल्या प्रकारावर प्रकाश टाकत 'लोकमत'शी संवाद साधला. सुशांत म्हणाला की, २६ नोव्हेंबर २०२० रोजी अध्यक्षांबाबत अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी थोडी मुदत मागितली, पण वर्षे झाले तरी यांना पदाचा मोह आवरत नाही. प्रमुख कार्यवाह म्हणून निर्माते माझ्याकडे विचारणा करत होते. अखेर १० दिवसांची मुदत देऊन आम्ही सभा आयोजित केली, पण मेघराज सभेला हजर राहिले नाहीत. सभेला उपस्थित राहिले असते तर कदाचित आजही तेच अध्यक्ष राहिले असते. सतीश बिडकर, सतीश रणदिवे, पितांबर काळे, रवी गावडे, निकिता मोघे, रत्नकांत जगताप यांच्यासह बऱ्याच जणांनी इतीवृत्तांत नामंजूर करत १३ पैकी आठ संचालकांनी मला अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. याबाबत मागच्या सभेतही मला विचारले होते, पण नकार दिला होता. पुन्हा विचारल्याने जबाबदारी स्वीकारली असून, अध्यक्षपदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. ऑडिटमधील चूका, एफडीमध्ये प्राॅब्लेम असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, पण यावर मी लेखाजोखा बघितल्यावरच बोलेन. विरोधासाठी आरोप करणार नाही. २६७ मराठी सिनेमांचे रखडलेले अनुदान मिळवून देण्याला प्राधान्य देणार आहे.
या सर्व घटनेवर मेघराज यांनी एक व्हिडीओ रिलीज करत 'हिंमत असेल तर निवडणूक घ्या', असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे. व्हिडिओमध्ये मेघराज म्हणाले की, कोल्हापूरमध्ये सभा घेऊन मला अध्यक्षपदावरून काढून सुशांत शेलार यांना बेकायदेशीररीत्या अध्यक्ष करण्यात आले आहे. हा सर्व मतलबी लोकांनी घेतलेला निर्णय आहे. मागील पाच वर्षांत जे कुठेही नव्हते ते आता पदावर विराजमान होऊ पहात आहेत. आम्ही कोरोनाच्या काळात लाखो रुपयांची मदत करून चोख हिशोब ठेवलेला असतानाही बिनबुडाचे आरोप करून दुसऱ्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांनी हे केले आहे त्यांना निवडणूक जिंकून पद मिळणार नसल्याची खात्री आहे. अशांना मी भीक घालणार नाही. आमची कायदेशीर लढाई सुरूच आहे. माझ्या अॅन्जिओप्लास्टीचा फायदा घेऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. हिंमत असेल तर निवडणूक घ्या असे मेघराज यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
मेघराज राजेभोसले (अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)लवकरच निवडणूक लावणार आहे. निवडणूक न घेता माझ्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला असून, बेकायदेशीरपणे नवीन अध्यक्षांची नेमणूक केली आहे. अशाप्रकारे नवीन अध्यक्षांची निवड करण्याची घटनेत कुठेही तरतूद नसल्याने आजही मीच अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच नवीन अध्यक्षांची निवड होईल आणि नवीन कार्यकारीणीही उदयास येईल. पुढील तीन-चार महिन्यांमध्ये महामंडळाची अधिकृत निवडणूक घेण्यात येणार आहे.