मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक अशी दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांची ओळख आहे. पण आता दिग्पाल एका तगड्या भूमिकेतून अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. होय, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj Movie) हा सिनेमा येत्या 22 एप्रिलला चित्रपटगृहात झळकणार आहे.शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हे चौथं पुष्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानच्या वधाचा प्रसंग शिवप्रेमींना अभिमान वाटावा असा प्रसंग या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘शेर शिवराज’ या चित्रपटातही अभिनेता चिन्मय मांडलेकर हाच शिवरायांची भूमिका साकारणार आहे. माँ जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा झळकणार आहेत. पण यावेळी बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होय, खुद्द दिग्पाल लांजेकर हे बहिर्जी नाईक यांची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहेत. यानिमित्ताने प्रथमच त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. बहिर्जी नाईक बदलल्याने सिनेमाला बसणार फटका?
पावनखिंड या चित्रपटात बहिर्जी नाईकची भूमिका अभिनेता हरिश दुधाडेनं साकारली होती. पण ‘शेर शिवराज’ या सिनेमात बहिर्जी नाईक यांची भूमिका स्वत: दिग्पाल लांजेकर साकारणार आहेत. त्यांनी स्वत: याचं पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. या पात्रावरचं ‘शिवबा राजं’ हे गाणंही शूट झालंय. बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत दिग्पाल एकदम शोभून दिसत असले तरी चाहत्यांनी मात्र त्यांच्या पोस्टवर काहीशा नाराजीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिग्पाल यांचं कौतुक तर होतंय, पण बहिर्जीच्या भूमिकेत चाहते हरिशला मिस करत आहेत. फर्जंदमध्ये प्रसाद ओकने बहिर्जीची भूमिका जिवंत केली होती. पण यानंतरच्या ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या दोन्ही सिनेमा हरिश दुधाडे हा बहिर्जींच्या भूमिकेत दिसला होता. अनेकांच्या मते, बहिर्जींच्या भूमिकेसाठी हरिश हाच परफेक्ट आहे.
‘हरिश दुधाडे यांना बदलण्याचा निर्णय आवडला नाही. ते नाईकांच्या भूमिकेत चपखल बसत होते, ’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. बहिर्जींच्या भूमिकेत हरिशच हवा होता, असं एकाने लिहिलं आहे. दिग्पाल सर, बहिर्जी नाईक म्हणजे फक्त आणि फक्त हरिश सर. काय नाय. यावेळी तुम्ही रोल घेतला पण पुढे त्यांना नक्की संधी द्या. अक्षरश: जगले ते हे पात्र, अशी भावना एका युजरने व्यक्त केली आहे. हरिश दुधाडेच भारी आहेत बहिर्जींच्या भूमिकेत. कशाला बदल केला? मूड ऑफ झाला माझा तरी चित्रपट बघण्याआधी, अशी काहीशी नाराजीची प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली आहे. अरे नाईक का बदलले? असा प्रश्न तर अनेकांनी विचारला आहे.
हरिश म्हणतो...दरम्यान ‘शेर शिवराज’ या चित्रपटात बहिर्जी नाईकांच्या भूमिकेतून रजा घेत असल्याची पोस्ट हरिश दुधाडेनं केली आहे. आजवर बहिर्जी नाईक म्हणून तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार. अशाच नवीन भूमिकांमधून तुमच्यासमोर येत राहीन. पण नाईक म्हणून सध्या तुमची रजा घेतोय. तुमचे आशीर्वाद कायम असू द्या, अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.