प्रतापगड ! नुसते नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर उभी राहते महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा ! ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे शिवाजी महाराजांच्या युध्दशास्त्राने दिलेलं एक अजोड देणं! तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठया कौशल्याने प्रचंड विजय मिळविला. त्यांच्या या गनिमी युध्दनीतीला आणि शौर्याला उभ्या जगात तोड नाही. हाच दैदिप्यमान इतिहास ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने येत्या शुक्रवारी २२ एप्रिलला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे.
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड चित्रपटांच्या यशानंतर लेखक–दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' हे चौथे चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.
‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते मुकेश ऋषी दिसणार आहेत. तर इतर व्यक्तिरेखांमध्ये मृणाल कुलकर्णी जिजाऊ आऊसाहेब, अजय पूरकर सुभेदार तानाजी मालुसरे, दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक, वर्षा उसगांवकर बडी बेगम, समीर धर्माधिकारी कान्होजी जेधे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केसरच्या भूमिकेत तर अक्षय वाघमारे पिलाजी गोळे, विक्रम गायकवाड सरनोबत नेताजी पालकर, आस्ताद काळे विश्वास दिघे, वैभव मांगले शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ बोकील, सुश्रुत मंकणी येसाजी कंक, दीप्ती केतकर मातोश्री दिपाईआऊ बांदल, माधवी निमकर मातोश्री सोयराबाई राणीसरकार, ईशा केसकर मातोश्री सईबाई राणीसरकार, रिशी सक्सेना फाझल खानची तर निखील लांजेकर नरवीर जीवा महाले, बिपीन सुर्वे सर्जेराव जेधे यांची भूमिका साकारणार आहे.
छत्रपती शिवरायांनी आपल्या तेजस्वी पराक्रमाने हिंदवी स्वराज्याचा नवा इतिहास घडवला. आपल्या तळपत्या खड्गानं त्यांनी शत्रूला पाणी पाजलं आणि हिंदवी स्वराज्याला एक नवी दिशा प्राप्त झाली. याच दैदिप्यमान इतिहासाचे सुवर्णपान येत्या शुक्रवारी २२ एप्रिलला चित्रपटगृहात उलगडताना दिसणार आहे.