Maharashtra political crisis : महाराष्ट्राचं राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर राज्यात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटत आहेत. राजकारण्यांपासून सेलिब्रिटी, सामान्य लोक सगळेच सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अशात मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी वेगळ्याच मुद्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर 24 तास राजकीय कव्हरेज देणाºया वृत्त वाहिन्यांना त्यांनी फैलावर घेतलं आहे. त्यांची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. केदार शिंदेंची पोस्ट
‘न्यूजचॅनल यांनी राजकारणी लोकांच्या पालख्या उचलण्यापेक्षा पालखी सोहळा वारकऱ्यांचा दाखवणे उत्तम... पुण्यतरी लाभेल. बस करा आता 24*7 तीच तीच करमणूक़.. तुमचं काय मत?’, अशी पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे.
त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बरोबर आहे सर, अगदी बरोबर... राजकारण बाजूला ठेवून राज्यात काय सुरू आहे ते दाखवा, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिल्या आहेत. लाख बोलले, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.
केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखलं जाणारं नाव आहे. केदार शिंदे हे एक दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि लोककला सादरकर्ते आहेत. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केले. प्रत्येक कलाकृतीमधून मध्यमवर्गीय, सामान्य माणसाला रिलेट होतील असे विषय केदार शिंदे यांच्याकडून सहज हाताळले जातात. अगं बाई अरेच्चा या गाजलेल्या चित्रपटापासून सुखी माणसाचा सदरा या मालिकेपर्यंता अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती त्यांनी केली आहे.