Join us

शितली उर्फ शिवानी बावकर झळकणार 'युथट्युब' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 11:32 AM

'युथट्युब' चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. 

ठळक मुद्दे तरूणाई व सोशल मीडियावर भाष्य करणारा चित्रपट 'युथट्युब' 'युथट्युब' लेखन व दिग्दर्शन केलंय प्रमोद प्रभुलकर यांनी 'युथट्युब' ३० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी वाहिनीवरील 'लागीर झालं जी' ही मालिका सध्या चांगलीच गाजते आहे. या मालिकेतून शितली या नावाने घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी बावकरने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची कमाल दाखवल्यानंतर ती रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ती 'युथट्युब' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. 

'युथट्युब' चित्रपटाचे नाव ऐकताच हा तरूणाईवर आधारीत चित्रपट असल्याचे वाटते. हो, हा सिनेमा तरूणाई व सोशल मीडियावर आधारीत आहे. तरूणाईचे सोशल मीडियासोबत वेगळे नाते तयार झाले आहे. या नात्यावर आधारीत 'युथट्यूब' हा चित्रपट आहे. या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद प्रभुलकर यांनी केले आहे. 'गोडगुपित', 'ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे', 'सुंदर माझे घर' अशा एकसे एक चित्रपटानंतर प्रमोद प्रभुलकर यांचा 'युथट्यूब' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाला संगीत पंकज पडघण यांनी दिले आहे. मधुराणी प्रभुलकर, शिल्पा देशपांडे व सायली कुलकर्णी यांच्या लेखणीतून या चित्रपटातील गीते साकार झाली आहेत. या गाण्यांना आपल्या सुरेल आवाजात सायली पंकज, आर्या आंबेकर, सागर फडके व शिखा अजमेरा यांनी स्वरसाज दिला आहे.

'युथट्युब' या सिनेमात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. यामध्ये मिरॅकल्स अकॅडमीच्या तीनशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर शिवानी बावकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. तिच्यासोबत कोण नायक झळकणार हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शिवानीला रुपेरी पडद्यावर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :लागिरं झालं जी