आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. काही सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरुन शिवजयंती निमित्त खास पोस्ट केल्या आहेत. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने शिवरायांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.
सोनालीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लाठीकाठी खेळताना दिसत आहे. लाठीकाठी झाल्यानंतर ती गारदही म्हणताना दिसत आहे. "पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा", असं म्हणत सोनालीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.
सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. हिरकणी या ऐतिहासिक सिनेमात ती दिसली होती.