धक्कादायक! ५०च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री वृद्धाश्रमात जगतेय हलाखीचे जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:16 PM2021-09-13T12:16:07+5:302021-09-13T12:16:29+5:30
१९५०च्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याने या मराठमोळ्या अभिनेत्रीने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
१९५०च्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याने या मराठमोळ्या अभिनेत्रीने रसिकांच्या मनावर छाप उमटविली होती. पन्नासच्या दशकांमध्ये त्यांनी काम करून अनेक चित्रपटाला यशोशिखरावर नेले होते. या अभिनेत्रीचे नाव आहे चित्रा नवाथे.
चित्रा नवाथे यांनी १९५२ साली रिलीज झालेल्या लाखाची गोष्ट या सुपरहिट मराठी चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट इतका गाजला होता की, अनेक वर्ष चित्रपटगृहात तो लागलेला होता. त्यानंतर बहिणीच्या बांगड्या, गुळाचा गणपती हा चित्रपट देखील त्यांचे गाजले होते. त्यानंतर राम राम पाहुणं, टिंग्या यासारखे चित्रपट देखील त्यांनी यशोशिखरावर नेले होते. मात्र, सध्या चित्रा नवाथे वृद्धाश्रमात हलाखीचे जीवन जगत असल्याचे सांगण्यात येते.
चित्रा नवाथे यांच्या पतीचे नाव राजा नवाथे असे होते. राजा हे हिंदी सिनेइंडस्ट्रीय कार्यरत होते. प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते अभिनेते शोमन राज कपूर यांच्या सोबत त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. त्यानंतर चित्रा आणि राजा नावाथे यांनी लग्न केले. काही वर्षांपूर्वी चित्रा यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. त्यानंतर राजा नवाथे यांचे देखील निधन झाले. त्यामुळे चित्रा या एकाकी पडल्या होत्या. त्यांनी आपल्या भावंडाचा आधार घेतला होता. चित्रा यांचा जुहू येथे भला मोठा बंगला आहे. मात्र, या बंगल्याचा सध्या कायदेशीर वाद सुरू असल्याचे सांगण्यात येते.
पायाला मोठी जखम झाल्यामुळे गेल्या वर्षी त्यांना सांताक्रुज येथील सरला नर्सिंग होम येथे ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षी कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर या नर्सिंग होम चे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले. त्यानंतर चित्रा नवाथे कुठे गेल्या हे कोणाला समजले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सापडल्या नाही. त्यानंतर त्या मुलुंड येथील गोल्डन केअर वृद्धाश्रमात सापडल्या आहेत. त्यांची बहीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांनी पोलिसात तक्रार देऊन त्यांचा शोध घेतला आहे.