मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी चित्रपट आणि नाटकमधील अभिनय आणि लावणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. सध्या त्या आजारपणामुळे चित्रपटसृष्टीपासून दुरावल्या आहेत. त्यांच्या आजारपणामुळे त्या अंथरुणाला खिळल्या आहेत.
मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार असल्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना वडीलांकडून मिळाले. त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. कलाक्षेत्रात अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अनपेक्षित यश संपादन केले.
एवढेच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास समजावा यासाठी त्यांनी लावणी संदर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून तमाशाचा इतिहास गुंफण्याचे कार्य घडवून आणले. यात त्यांच्या फडातील ११ कलाकारांनी मोठी मदत केली. यावर आधारीत सखी माझी लावणी हा कार्यक्रम त्यांनी सादर केला. पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच फळाला आला.