अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) निर्मित केलेला 'पोस्टर बॉयज' (Poster Boys) हा सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव आणि हृषिकेश जोशी यांची मुख्य भूमिका होती. आता सिनेमाच्या दुसऱ्या भागाची नुकतीच घोषणा झाली आहे. तसंच सिनेमाचे भव्य पोस्टर दादरच्या प्लाझा सिनेमा येथे सॉंच करण्यात आले. यावेळी श्रेयस तलपदेची पत्नी दीप्ती तळपदे एका आठवणीत भावूक झाली.
पोस्टर बॉईज २ (Poster Boys 2)चं भव्य पोस्टर अनावरण झालं. पण अभिनेता श्रेयस तळपदेची बायको दीप्ती १७ वर्षांपूर्वीच्या एका आठवणीत हरवून गेली. तो किस्सा काय होता हे तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. ती म्हणाली,'१७ वर्षांपूर्वी इक्बाल हा सिनेमा जेव्हा रिलीज व्हायचा होता तेव्हा त्याचे पोस्टर्स लागायला सुरुवात होणार होती. आमच्या घरापासून थोडं जवळ डी एन नगर इथे भव्य होर्डिंग होतं. पोस्टर लागले असा श्रेयसला फोन आला म्हणून आम्ही लगेच गाडी काढून निघालो. मग बघितलं तर एक माणूस पोस्टर लावत होता. आम्ही त्याला विचारलं कोणाचं आहे पण त्याला कल्पना नव्हती. मग आम्ही गाडीतच बसून राहिलो आणि काही क्षणात इक्बालमधील श्रेयसचं भव्य पोस्टर झळकताना आम्ही लाईव्ह दृश्य पाहिलं.'
दीप्ती पुढे म्हणाली,'तो दिवस आणि आजचा दिवस आहे फरक हाच की इक्बालचं पोस्टर बघताना मी खाली उभी होते आणि आज पोस्टर बॉईजचं पोस्टर बघताना आम्ही सगळे वरती होतो. पण हा क्षण आमच्या दोघांसाठी खरंच खूप खास होता'
पोस्टर बॉईज २ ची निर्मितीही श्रेयस तळपदेच करणार आहे. या सिनेमाचं संपूर्ण शूट लंडन येथे होणार आहे. पोस्टर वरील कलाकारांची स्टायलिंग (styling) स्वत: दीप्तीने केली आहे.