Join us

कोणताही गाजावाजा न करता मराठी कलाकार बनला कोरोना वॉरियर, गेल्या आठ महिन्यांपासून करतोय मुंबईकरांची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 3:07 PM

कोरोनाची लागण झाली तेव्हा देखील त्याचे कार्य सुरु होते. मराठी सोबत हिंदी सिनेमातही विकास झळकला आहे. 'सिंघम' या सिनेमातही त्याने भूमिका साकारली आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सर्वत्र औषधे, बेड्स, ऑक्सिजनचा अभाव बघायला मिळतोय. सध्या चित्रीकरण महाराष्ट्रात थांबलं असल्याने अनेक कलाकार सिनेक्षेत्रातील कामं थोडी बाजूला ठेवून समाजसेवेमध्ये हातभार लावताना दिसत आहेत. सेलिब्रेटी देखील मैदानात उतरत कोरोना पिडीतांची सेवा करत आहेत. मात्र असाही एक मराठी कलाकारा आहे जो कोणताही गाजावाजा न करता कोरोना पिडीतांच्या अविरत सेवा करतोय. कदाचित त्याने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचलीही नसेल.गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्याचे हे कार्य अविरत सुरु आहे. तो कलाकार आहे.  'श्रीयुत गंगाधर टीपरे' मालिकेत शी-याची भूमिका साकारणार अभिनेता विकास कदम.विकासचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कोरोना काळात त्याने केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे.

विकासने मुंबईतल्या बीकेसीमध्ये कोविड टेस्टिंग लॅब उपलब्ध करुन दिली आहे. कोविडची पहिली लाट आली तेव्हा देखील त्याने मोठ्या प्रमाणावर मास्क आणि सॅनेटायजरचे वाटप केले होते. आणि त्यानंतर एका मित्राच्या मदतीने विकासने एक लॅब सुरु करायचे ठरवलं. त्यानुसार लॅब उभारण्यात आली. गेल्या आठ महिन्यांपासून ही लॅब २४ तास सुरु असते.

हे काम करत असताना खुद्द विकासलाही दोनवेळा कोरोनाची लागण झाली मात्र तो तिथेच थांबला नाही, कोरोनावर मात करत  ठणठणीत बराही झाला. कोरोनाची लागण झाली तेव्हा देखील त्याचे कार्य सुरु होते. मराठी सोबत हिंदी सिनेमातही विकास झळकला आहे. 'सिंघम' या सिनेमातही त्याने भूमिका साकारली आहे. इतकेच नाही तर रोहित शेट्टीसोबतही त्याने पडद्यामागे राहून अनेक कामं केली आहेत. विशेष म्हणजे कोरोनाकाळात कोणत्याही कामाचा गाजावाज न करता तो काम करत राहिला. मुळात काम होणं, समाजात चांगलं आणि सकारात्मक काम होणं हेच उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून आजही तो त्याचे कार्य करत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या