आज देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात मुंबईसह ठाणे, कल्याण, नाशिकमध्ये मतदान होत आहे. नवमतदारांसह वृद्धही उत्साहात मतदानाला बाहेर पडले आहेत. सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी सर्वच मतदानाचा हक्क बजावत आहेत. वयाच्या सत्तर-ऐशीत असलेले नागरिकही आवर्जुन मतदान केंद्रावर येऊन मतदान करत आहेत. मराठी तसंच हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शुभा खोटे (Shubha Khote) यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अभिनेत्री शुभा खोटे या 86 वर्षांच्या आहेत. घरी बसून मतदान करण्याचा पर्याय असताना त्या मतदान केंद्रावर आल्या आहेत. मतदानानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, "योग्य उमेदवाराला मत दिलं आहे. आता जितकं आयुष्य शिल्लक राहिलंय ते सुखशांतीत जावो हीच इच्छा आहे. जे काही गरजेचं आहे ते मिळालं तर खूप झालं. आम्हाला बघून इतरांनाही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी येऊन मत द्यावं. आम्हा वयोवृद्धांना घरी बसूनही मतदानाचा अधिकार आहे. पण मी मतदान केंद्रातच येऊन मत दिलं आहे."
दोन महिन्यांपूर्वीच शुभा खोटे यांच्या पतीचं निधन झालं. त्यांचा ६४ वर्षांचा संसार होता. शुभा खोटे यांनी मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे सर्वच चाहते आहेत.
आज मतदानानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी रांगेत उभं राहून मतदान केलं. धर्मेंद्र, अनुपम खेर, कैलाश खेर, सुभाष घई, राजकुमार राव, जान्हवी कपूर, तबू, रणवीर सिंह-दीपिका पदुकोणसह अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.