मराठी कलाविश्वातील टॉप अभिनेत्यांच्या यादीत सिद्धार्थ चांदेकरचं (siddharth chandekar) आवर्जुन नाव घेतलं जातं. फार कमी कालावधीमध्ये त्याने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. अलिकडेच त्याचा 'झिम्मा 2' हा सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे तो सातत्याने चर्चेत येत आहे. सिद्धार्थने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने पहिल्यांदाच इंडस्ट्रीतील काही मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केलं.
सिद्धार्थने 'हमने जीना सीख लिया' या बॉलिवूडपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली. मात्र, मराठी कलाविश्वात त्याने त्याची छाप पाडली. २०१० मध्ये अग्निहोत्र या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर इंडस्ट्रीत त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थने त्याला इंडस्ट्रीतील खटकणारी गोष्ट कोणती ते सांगितलं. सोबतच त्या मागचं कारणही त्याने सांगितलं. ''कलाविश्वात एखाद्याच्या मागे त्याच्याविषयी खूप बोललं जातं. ही गोष्ट मला फार खटकते. जे आहे ते त्या व्यक्तीच्या समोर बोलायला हवं'', असं सिद्धार्थ म्हणाला. त्यानंतर त्याने स्वत: विषयी खटकणारी गोष्ट कोणती ते सुद्धा सांगितलं.
दरम्यान, ''मला उशीरा उठायची आणि उशीरा झोपायची सवय आहे. या सवयी मला बदलायच्या आहेत'', असं सिद्धार्थ म्हणाला. सिद्धार्थने त्याच्या करिअरमध्ये झेंडा, क्लासमेट, सतरंगी रे, गुलाबजाम, झिम्मा, झिम्मा 2 यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमात त्याने काम केलं आहे.