सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. दोघेही उत्तम कलाकार असून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. 'फसक्लास दाभाडे' या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि मिताली पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सिद्धार्थ आणि मितालीचा हा पहिलाच सिनेमा आहे. आणि आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच हा सिनेमा प्रदर्शितही होत आहे.
लग्नाचा वाढदिवस आणि 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचं प्रदर्शन याबाबत सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने पत्नी मितालीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्यामागे खंबीरपणे उभं राहणार असल्याचं म्हटलं आहे. "बायको! आज आपल्या anniversary ला आपल्या दोघांचा पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय. किती भारी! मी कायम तुझी अभिनय करण्याची भूक, धडपड आणि तडफड पाहत आलोय. मला कायमच तुझा अभिमान होता, पण तुझं हे काम बघून तर मला जरा जास्तच अभिमान वाटतोय", असं सिद्धार्थने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे तो लिहितो, "तू एक सुंदर अभिनेत्री आहेस, आणि तू आईशप्पथ कडक काम केलयस. तुझ्या कडे इतकं यश येवो, इतकं ऐश्वर्यं येवो, की तुला मागे वळून बघायची गरजच भासणार नाही. मी नेहमीसारखा खंबीरपणे तुझ्या मागे उभा आहे. तू लढ! बाकी तेरा आदमी देख लेगा!🤗Happy Anniversary!".
'फसक्लास दाभाडे' सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, राजसी भावे, हरिश दुधाडे अशी स्टारकास्ट आहे. हेमंत ढोमेचं लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आज(२४ जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित होत आहे.