Siddharth Chandekar Mitali Mayekar: नवरा, बायको आणि भांडण हे अतूट नातं आहे. सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी कपल, नवरा-बायको म्हटलं की भांडणं आलीच. घराघरात पाहायला मिळणारी नवरा आणि बायकोमधली भांडणं काही नवीन नाहीत. असं म्हणतात आपण त्याच्याशीच भांडतो ज्याच्यावर आपलं खूप प्रेम असतं. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) व मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांचं तर लग्नादिवशीच मोठे भांडण झाले होते, असा खुलासा त्यांनी केलाय.
'फसक्लास दाभाडे' या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि मिताली पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'फसक्लास दाभाडे'च्या (Fussclass Dabhade Movie) टीमनं नुकतंच 'नवशक्ती' युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी सिद्धार्थ आणि मितालीनं त्यांच्या लग्नातील एक किस्सा शेअर केला. लग्नाच्या आदल्यारात्री संगीत झाल्यानंतर सिद्धर्थ आणि मिताली यांचं मोठं भांडण झालं होतं. अगदी छोट्या कारणावरुन भांडण सुरू झालं आणि मग त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणामध्ये झाल्याचं सिद्धार्थने सांगितलं.
सिद्धार्थ म्हणाला, "लग्नाच्या आदल्यारात्री संगीत झालं. सगळे नाचले, माझ्या नातेवाईकांनी जे नाच बघायला नको, ते त्यांनी सगळं पाहिलं. नाचून सगळे थकले होते. आम्ही दोघेही खूप थकलो होतो. यातच आमचं भांडणं सुरू झालं. आमचं भांडण वेगळ्याच कारणावरून सुरू झालं होतं. कारण अगदी छोटं होतं, त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणामध्ये झालं आणि हे सर्व पहाटे साडेतीन वाजता सुरू होतं. त्यानंतर तीन तासांनी आम्हाला विधींना बसायचं होतं".
"साडेतीन वाजता आमच्या भांडणाला सुरूवात झाली. त्यानंतर हिच्या खोलीत दोन मैत्रीणी बाहेर आल्या. माझे भाऊ, मित्र वैगेरे बाहेर आले. आमच्यातलं भांडण पाहून एकाने विचारलं की अलार्म लावू ना सकाळचा? लग्नासाठी उठायचं आहे ना? तुमचं काय ठरलं आहे? तेव्हा आम्ही एकमेकांना तुझे नातेवाईक बघ ना, काहीचं काम करत नाहीयेत, असं मोठमोठ्याने म्हणत होतो". पुढे मितालीने सांगितले की, "भांडणानंतर मी माझ्या खोलीत गेले. त्यानंतर पाच मिनिटांनी सिद्धार्थ मला सॉरी म्हणायला आला. माझं चुकलं, सॉरी वैगेरे तो म्हणाला. त्यानंतर ते भांडण मिटलं. चांदेकरांनी माफी मागितली".