सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. शूटिंगसाठी केदारनाथला गेलेल्या सिद्धार्थला विलक्षण अनुभव आला. हा अनुभव त्याने चाहत्यांसोबत शेअर केला.
सिद्धार्थने नुकतीच अजब गजब या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत केदारनाथचा अनुभव सांगताना सिद्धार्थ म्हणाला, "शूटिंगसाठीच मी आयुष्यात पहिल्यांदाच केदारनाथला गेलो होतो. खूप मोठी रांग होती आणि शूटिंगसाठी वेळ कमी होता. मला आत जाऊन दर्शन घ्यायचं होतं. पण, रांग बघून दिसत होतं की तीन तास वगैरे लागतील. तर मी म्हटलं की मी आतमध्ये येत नाही कारण, वेळ जाईल".
"तितक्यात तिथला एक गार्ड मला बोलवायला आला की तुम्हाला आत बोलवलंय. मी म्हटलं कोणी बोलवलंय? त्याने मला आतमध्ये नेलं तर समोर शंकर भगवान. मी जाऊन बसलो आणि भगवान शंकराच्या पाठीवर भस्म लावलं. मला आठवत नाही मी काय काय केलं. ते असं आपोआप घडलं. कोणी बोलवलं ते मला माहीतच नाही. कदाचित नानांनी बोलवलं असेल म्हणून मी त्यांना विचारलं. तर नाना म्हणाले की मी तुला बोलवलं नाही", असं त्याने सांगितलं.
दरम्यान, सिद्धार्थ आता 'फसक्लास दाभाडे' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत मिताली मयेकरही दिसणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमा येत्या २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अमेय वाघ, क्षिती जोग, निवेदिता सराफ अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे.