आईच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ चांदेकरने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. उत्कृष्ट अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मराठी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. सिद्धार्थने नुकतीच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने अभिनयातील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं. यावेळी त्याने त्याच्या बरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला.
गोरेगावात राहत असताना सिद्धार्थच्या घराजवळ बिबट्या आला होता. हा प्रसंग त्याने मुलाखतीत सांगितला. तो म्हणाला, "आम्ही गोरेगावात राहत असताना घराची खिडकी आणि डोंगरात फक्त एका भिंतीचं अंतर होतं. दुपारी घरात मी आई आणि मिताली बसलो होतो. त्या भिंतीवर मला काहीतरी पिवळं चालत येताना दिसलं. ते बघताच मी आरडाओरडा सुरू केला. माझा कॅमेरा कुठेय असं म्हणून मी ओरडत होतो. दोघींना प्रश्न पडला हा असा काय वागतोय. तेव्हा बिबट्या आलाय बिबट्या असं मी म्हणालो. बिबट्या त्या भिंतीवरून चालत आला आणि बसला. जसा तो बसला तसं माझ्याकडे असलेली फिमेल श्वान त्याच्याकडे बघून भुंकायला लागली. तिच्या भुंकण्याचा आवाज ऐकून बिबट्या आमच्याकडे पाहू लागला."
"आदल्याच रात्री बिबट्या आमच्या सोसायटीतील फिमेल श्वान उचलून घेऊन गेला होता. जिथे मी गाडी पार्क करतो. तिथूनच तो घेऊन गेला होता. मारलेलं कुत्र त्याने झुडपात लपवून ठेवलं होतं. सोसायटीतले सगळे खिडकीत येऊन बघायला लागले. आरडाओरडा सुरू होता. तो बिबट्या शांतपणे तिथून उठला. त्याने ते झुडपात लपवलेलं कुत्रं तोंडात पकडलं आणि ऐटीत चालून निघून गेला. तेव्हा मला जाणवलं की आपण चुकीच्या जागेत राहत आहोत. कारण, ही त्याची टेरटरी आहे. आपण म्हणतो की तो आपल्या सोसायटीत आला. पण, आपण त्याच्या जागेत राहत आहोत. आम्ही जेव्हापासून जंगल सफारीवगैरे करायला लागलो. तेव्हापासून याबाबत जास्त गांभीर्याने विचार करायला लागलो आहोत," असंही सिद्धार्थने पुढे सांगितलं.