आपण समाजाचा एक भाग आहोत. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना एक समाज म्हणून आपल्या सर्वांच्याच मनात असायला हवी. आज ही भावना मनात ठेवत अनेक कलाकार आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजोपयोगी कामसाठी आवर्जून वापरतात. सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूडचे कलाकार अनेक समाजोपयोगी कामं करत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता सिद्धार्थ जाधवने देखील काही अनाथ मुलांना मदत केली आहे.
महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत असतो. पण या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही दडलेला आहे, हे त्याने नुकतंच दाखवून दिलंय. नुकत्याच एका कार्यक्रमात सिद्धार्थने बीडच्या सहारा अनाथालयाच्या निराधार मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवण्यासाठी धनराशी भेट दिली आहे.
14 वर्षांपूर्वी सहारा अनाथलायाची स्थापना करून अनेक उपेक्षित, आणि वंचित मुलांना घर मिळवून देणाऱ्या संतोष गर्जेचा त्याच्या सामाजिक कामासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला. तेव्हा संतोषने मनमोकळं करताना आपली आत्मकथा आणि निराश्रीत मुलांची व्यथा सांगताच सिद्धार्थने सर्वांसमक्ष धनराशी देण्याचे जाहीर केले. याविषयी अभिनेता सिद्धार्थ जाधव सांगतो, "बीडच्या पाटसरा या दुर्गम खेड्यातल्या गरीब उसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या संतोषचा मला अभिमान आहे. वयाच्या 19 व्या वर्षापासून तो अनाथ आणि उपेक्षित मुलांसाठी काम करतो. त्याच्या सहारा अनाथालयात 85 निराधार मुलं आहेत. या मुलांसाठी मी खारीचा वाटा उचलला, इतकेच म्हणेन. जी मी धनराशी दिली, ती संतोषच्या कार्यापुढे फारच छोटी होती."
सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयाने एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यासोबतच तो आज बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारत आहे. लवकरच त्याचा सिम्बा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान यांच्यासोबतच सिद्धार्थ महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ते तिघेही नुकतेच लोकमतच्या मोस्ट स्टायलिश 2018 पुरस्कार सोहळ्याला आले होते.