कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सर्वत्र औषधे, बेड्स, ऑक्सिजनचा अभाव बघायला मिळतोय. सध्या चित्रीकरण महाराष्ट्रात थांबलं असल्याने अनेक कलाकार सिनेक्षेत्रातील कामं थोडी बाजूला ठेवून समाजसेवेमध्ये हातभार लावताना दिसत आहेत. आज प्रत्येक कलाकार कोरोना पिडीतांची सेवा करत आहे.
देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हिंदी असो किंवा मराठी आणि मालिका क्षेत्रातील अनेक कलाकारांनी जमेल तसे गरजूंना विविध मार्गांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पण सर्वाधिक चर्चा झाली ती केवळ बॉलिवूड कलाकारांचीच. बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराचे मदतकार्याची प्रत्येक माहिती दिली जाते.
दुसरीकडे मराठी कलाकारसुद्धा तितक्याच निस्वार्थ भावनेने कोरोना काळात मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. पण तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा खूप वाईट वाटते असे मत अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्यक्त केले आहे. टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने याविषयी आपले मन मोकळे केले आहे.
माझे काही कलाकार मित्र मंडळी दिवस रात्र कोरोना काळात अविरत सेवा करतायेत. कुणी कोविड टेस्टिंग लॅब उपलब्ध करुन दिली आहे. कुणी रक्तदान करत आहे, कुणी जेवणाची सोय करत आहे.कोरोना काळात सोशल मीडियावर करोनाशी संबधित आलेली प्रत्येक माहिती पोस्ट करत आहेत. कुणाला बेड हवाय तर कुणाला ऑक्सिजन.
कुठे काय उपलब्ध आहे याची आमच्याकडे आलेली माहिती आम्ही चाहत्यांसोबत शेअर करत आहोत.जेणेकरून आमच्या एखाद्या पोस्टमुळे गरजूंना मदत होईल. मी स्वतः सोशल मीडियाचा वापर हा करोनाशी संबंधित पोस्टसाठी करत आहे. फक्त इतकंच की आम्ही मराठी कलाकारा आमच्या केलेल्या मदतीचा कुठेही गाजावाजा करत नाहीत.
कोरोना काळातच नाहीतर याआधीही आलेल्या संकटात मराठी कलाकाराने कसलाही विचार न करता मदतीचा हात पुढे केला होता. 'कोल्हापूरात आलेला पूर असो किंवा राज्यात येणारी संकट अशा अनेक वेळेला मराठी कलाकारांनी रस्त्यावर उतरून, गावोगावी जाऊन मदत केली आहे.
'श्रीयुत गंगाधर टीपरे' मालिकेत शी-याची भूमिका साकारणार अभिनेता विकास कदम.विकासचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कोरोना काळात त्याने केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे.विकासने मुंबईतल्या बीकेसीमध्ये कोविड टेस्टिंग लॅब उपलब्ध करुन दिली आहे. कोविडची पहिली लाट आली तेव्हा देखील त्याने मोठ्या प्रमाणावर मास्क आणि सॅनेटायजरचे वाटप केले होते. आणि त्यानंतर एका मित्राच्या मदतीने विकासने एक लॅब सुरु करायचे ठरवलं. त्यानुसार लॅब उभारण्यात आली. गेल्या आठ महिन्यांपासून ही लॅब २४ तास सुरु असते.