अख्या महाराष्ट्राचा 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधव हा अस्सल मराठी माणूस असला तरी त्यानं मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे. अभिनयाबरोबरच त्याच्या स्टाइलचे लाखो चाहते आहेत. कॉलेज जीवनापासून अभिनयाची सुरुवात केलेला सिद्धार्थ आज चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. नुकतंच सिद्धार्थच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 'स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४' हा पुरस्कार देऊन त्याला गौरविण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील मानाचा पुरस्कार मिळाल्याची माहिती सिद्धूने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे. त्याने लिहलं, 'जगाने म्हणावे शाब्बास रे शाब्बास ...ज्यांनी मराठी चित्रपटासृष्टी गाजवली, वाजवली,अभिनयाची दादागिरी केली...ते म्हणजे स्वर्गीय दादा कोंडके सर... यांच्या नावाने दिला जाणारा 'स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४' यावर्षीचा पुरस्कार अभिनय विभागासाठी मला देण्यात आला...खूप भारी फिलिंग आहे... मी "मराठी सांस्कृतिक अभियान न्यास" यांचा मनापासून आभारी आहे... त्यांनी माझी या पुरस्कारासाठी माझी निवड केली..आणि माझ्याबरोबर ज्या ज्या मान्यवर कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांचेही मनापासून अभिनंदन...आणि तुम्ही माय बाप रसिक...असाच आशीर्वाद असावा..कायम'.