Siddharth Jadhav : मराठीतील आघाडीचा आणि विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपला जलवा दाखवतोय. मराठीत त्याचा 'बालभारती' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला तर हिंदीत त्याने रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सर्कस'मध्ये भूमिका केली. प्रोफेशनल आयुष्यासोबतच सिद्धार्थचे वैयक्तिक आयुष्यही मध्यंतरी चर्चेत आले होते. सिद्धार्थचे त्याच्या पत्नीसोबत बिनसल्याची आणि दोघांचा लवकरच घटस्फोट होणार अशी चर्चा सुरु झाली होती.
दरम्यान आता सिद्धार्थने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये त्याने थेट लग्नावरच भाष्य केले आहे. मात्र हा व्हिडिओ गंभीर नसून विनोदी आहे. सिद्धार्थने त्याच्या दोन्ही मुली स्वरा आणि इरा यांच्यासोबत हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये सिद्धार्थ म्हणतो, 'आयुष्यात तीन गोष्टी कधीही करु नका. एक मुलगी म्हणते, घरच्यांच्या पसंतीने लग्न, दुसरी मुलगी म्हणते स्वत:च्या पसंतीने लग्न आणि सिद्धार्थ म्हणतो 'लग्न'. सिद्धार्थने हा व्हिडिओ गंमतीत मुलींसोबत मस्ती करताना बनवला आहे.
सिद्धार्थच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी सुद्धा 'पटलं दादा', 'खरंच आहे' अशा कमेंट्स केल्या आहेत. बापलेकीची मज्जा असे हॅशटॅग त्याने व्हिडिओखाली दिले आहे.
सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने सोशल मीडियावरुन जाधव हे नाव हटवलं आणि चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर ते वेगळे होणार अशीच चर्चा सुरु झाली. दोघांच्यात बिनसलं आहे काही आलबेल नाही अशा अफवा पसरु लागल्या. सिद्धार्थनेही सु्ट्टी एन्जॉय करतानाचे केवळ मुलींसोबतचेच फोटो पोस्ट केले होते. काही दिवसांनंतर सिद्धार्थने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. आमच्यात सर्व काही ठीक असल्याचं त्याने सांगितलं होतं.
सिद्धार्थ आणि तृप्ती अक्कलवार दोघांनी २००७ मध्ये लग्न केले. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली झाल्या. झलक दिख ला जा या शोमध्ये दोघेही सहभागी झाले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती.