मराठी सिनेसृष्टीत तुफान नेम आणि फेम मिळवलेला सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आज बॉलिवूडमध्येही गाजलेलं नाव आहे. सिद्धार्थचा मोठा चाहतावर्ग आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेल्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सिद्धार्थ जाधवने 'सिम्बा' आणि 'सर्कस' या सिनेमात रणवीरसोबत काम केले आहे. दोघांचे केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडलेली. खऱ्या आयुष्यात सुद्धा सिद्धार्थ आणि रणवीर खूप चांगले मित्र आहेत. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. नुकतंच सिद्धार्थने रणवीरचं तोंडभरून कौतुक केले.
सिद्धार्थ जाधवने नुकतीच कॅचअप या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं रणवीर सिंगचं कौतुक केलं. तो म्हणाला, "रणवीर सिंग हा कमाल अभिनेता आहे. अभिनेता म्हणून तो सरप्राईज करतो. तो खरा गनिमी कावा करतो, असे मी म्हणेन. जेव्हा तुम्ही त्याचं काम बघता तेव्हा कौतुक वाटतं, 'लुटेरा', 'सिम्बा', 'पद्मावत' 'जयेशभाई जोरदार' बघा. अभिनेता म्हणून मलाही सरप्राईज करायला आवडेल. मी त्याच्या आधीपासून सरप्राईज करण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याच्यामुळे मला एक आत्मविश्वास आला. त्याच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या".
पुढे सिद्धार्थ जाधव रणवीर सिंहची कॉपी करतो असे लोक म्हणतात त्याबाबत म्हणाला, "कोणालातरी शाहरूख म्हणतात, आणखी कोणाला इतर अभिनेत्याचं नाव देतात. मला सर्वात जास्त काय आवडतं की लोक मला मराठी अभिनेता म्हणून संबोधतात. मी माझ्या मराठी इंडस्ट्रीचे प्रतिनिधित्व करतो. कितीतरी कलाकार आहेत, त्यात मला सौभाग्य मिळतं तर मला ते आवडतं".