उत्तम अभिनयशैली, हटके स्टाइल स्टेटमेंट आणि दिलदारपणा यामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). आज सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सगळीकडे त्याची चर्चा होते. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. अलिकडेच सिद्धार्थने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने दारुच्या व्यसनापासून दूर असल्याचं सांगितलं.
सिद्धार्थचं त्याच्या कुटुंबियांवर किती प्रेम आहे हे वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. विशेष म्हणजेच याच कुटुंबासाठी आणि खासकरुन आईच्या शब्दाखातर सिद्धार्थ आजही व्यसनांपासून दूर आहे.
सिनेमागृहाबाहेर वडिलांनी पेपरवर झोपून काढले दिवस; त्यासमोरच्या टॉवरमध्ये घेतलं सिद्धार्थने घर
"खूप असे दिग्गज कलाकार आहेत जे व्यसन करत नाहीत. मुळात ते केलंच पाहिजे असं काही नसतं. मी माझ्या आईला वचन दिलंय की दारुला कधी हात लावणार नाही, आत्महत्या करणार नाही," असं सिद्धार्थ म्हणाला.
दरम्यान, सिद्धार्थ एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा आहे त्यामुळे त्याच्या स्वभावातून, वागण्याबोलण्यातून त्याचा साधेपणा कायम दिसून येतं. सिद्धार्थने मराठीसह हिंदी कलाविश्वातही त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. रणवीर सिंहसोबत त्याने सर्कस सिनेमात स्क्रीन शेअर केली आहे.