Join us

Video: मितालीमुळे बदललं सिद्धार्थचं आयुष्य; बायकोला दिलं यशाचं क्रेडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:53 IST

Siddharth chandekar: मितालीच्या येण्यामुळे सिद्धार्थचं आयुष्य बदललं असून त्याने त्याच्या यशाचं श्रेय तिला दिलं आहे.

मराठी कलाविश्वातील हँडसम हंक, लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar). आजवरच्या कारकिर्दीत सिद्धार्थने अनेक गाजलेले सिनेमा कलाविश्वाला दिले आहेत. अलिकडेच त्याचा 'झिम्मा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. यामध्येच अलिकडेच त्याने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मितालीसोबत लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला यावर भाष्य केलं.

सिद्धार्थने या मुलाखतीमध्ये त्याच्या फिल्मी करिअरविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी भाष्य केलं. यात त्याने त्याच्या आईच्या लग्नापासून ते स्वत:च्या खासगी आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामध्येच त्याने त्याच्या सगळ्या यशाचं क्रेडिट पत्नी मिताली मयेकर (mitali mayekar) हिला दिलं आहे.

लग्नाआधी आणि लग्नानंतर आयुष्यात काय बदल घडला आहे?, असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला होता. त्यावर, त्याने आयुष्यात मितालीच्या येण्यामुळे काय बदल झाला हे सांगितलं.

काय म्हणाला सिद्धार्थ?

"खूप बदल घडला आहे. माझ्यातील एंझायटी कमी झाली आहे आणि शांतपणा आलाय स्वभावात. लग्नाकडे लक्ष देण्यासोबतच माझं कामाकडे लक्ष द्यायचं प्रमाणही वाढलं आहे. माझ्या करिअरच्या बाबतीत मिताली प्रचंड लकी ठरली आहे, असं सिद्धार्थ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आता माझ्या करिअरची गाडी पळतीये. पण, पुढे कुठे तरी ती स्लो डाऊन होणार आहे. थांबेलही किंवा बिघडेलही. पण ज्या -ज्या सुंदर बायका आहेत ना माझ्या आयुष्यात, त्यांच्यामुळे मला माहितीये की.. मी थांबलो तरी पुन्हा तो वेग घेणार आणि ती गाडी पुन्हा जोरदार वेगाने धावणार. मग पुन्हा थांबणार. तर हे होत राहणार पण मला आता त्या गोष्टीची भिती नाहीये. मुळात लग्नानंतर काय बदल झाला असा प्रश्न असेल तर मला अपयशाची भीती राहिलेली नाहीये. अपयश हे कधीही कोणत्याही प्रकारे येऊ शकतं. पण, अपयश येण्यापूर्वीच माझे हातपाय आता थरथरत नाहीत."

दरम्यान, मिताली आणि सिद्धार्थ यांचं लव्ह मॅरेज आहे. मोठ्या थाटात या जोडीने लग्नगाठ बांधली. आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरसेलिब्रिटीसिनेमा