बहुचर्चित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा २५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकातील या पाचव्या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार प्रेक्षकांना या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत. सुभेदारच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही सुभेदार चांगली कमाई करत असल्याचं दिसत आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.
तान्हाजी मालुसरेंनी कोंढाणा जिंकून तो स्वराज्यात सामील केला होता. हा गड राखण्यासाठी ते धारातीर्थी पडले होते. त्यांच्या या बलिदानानंतर कोंढाणाचे नाव बदलून सिंहगड असे करण्यात आले होते. सिंहगडाच्या लढाईची गोष्ट सांगणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसचा गड राखला आहे. 'सुभेदार'ने पहिल्या वीकेंडला ५ कोटींची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचे कलेक्शन समोर आलं आहे. 'सुभेदार'ने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
"लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा
'सुभेदार' चित्रपटाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल होताना दिसत आहेत. परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'सुभेदार'ने पहिल्या आठवड्यात तब्बल ८.७४ कोटींची कमाई केली आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज आणि मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.