लिटल चॅम्पमुळे नावारूपाला आलेल्या शमिका भिडेचे नुकतेच गौरव कोरेगावकरसोबत लग्न झाले. गौरव आणि शमिका यांचा साखरपुडा 9 मेला रत्नागिरीत झाला होता. त्यांनी लग्न देखील रत्नागिरीमध्येच केले. हा लग्नसोहळा धुमधडाक्यात 6 डिसेंबरला पार पडला. गौरव हा देखील इंडस्ट्रीशी निगडित आहे. त्याने आजवर वेगवेगळ्या जिंगल्स आणि जाहिरातींसाठी संगीत दिले आहे.
इयत्ता चौथीपासून शमिकाने रत्नागिरीत प्रसाद गुळवणी आणि नंतर मुग्धा सामंत - भट यांच्याकडे गायनाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली. शिक्षण सुरू असतानाच शमिका झी मराठी वाहिनीवरील सारेगमपमध्ये सहभागी झाली होती. त्याचवेळी गायक अवधूत गुप्ते यांनी शमिकाला कोकणकन्या ही नवीन ओळख मिळवून दिली होती. गेली आठ वर्षे शमिका जयपूर घराण्याच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे मुंबईत राहून गायनाचे शिक्षण घेत आहे.
कलर्स वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती. गायनाचे शिक्षण सुरू असतानाच शमिकाने रंगभूमीवर पाऊल ठेवत पहिल्यांदाच संगीत मेघदूत नाटकात अभिनेत्रीची भूमिका साकारली. याशिवाय नाट्यसंपदा व यशवंत देवस्थळी निर्मित चि. सौ. कां. रंगभूमी नाटकात काम करत आहे. गायिका व अभिनेत्री असा दुहेरी प्रवास सध्या तिने सुरू केला आहे.