लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट...’ या गाजलेल्या गाण्यात आपल्या सुमधुर गायकीने कोकणातील निसर्गसौंदर्य आणखी खुलवणाऱ्या ६०-७० च्या दशकातील गायिका शारदा (८६) यांचे कर्करोगामुळे मुंबईत निधन झाले.
२५ ऑक्टोबर १९३७ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या शारदा अय्यंगार या रसिकांमध्ये ‘शारदा’ या नावाने लोकप्रिय होत्या. १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूरज’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पार्श्वगायिकेच्या रूपात पदार्पण केले. सूरजमधील ‘तितली उडी...’ हे त्यांचे गाणे रसिकांच्या कायम स्मरणात राहिले. त्यासाठी त्यांना विशेष पुरस्कार मिळाला. त्यानंतर पुरुष आणि महिला गायकांसाठी स्वतंत्र पुरस्कार मिळू लागले.
त्यांनी हिंदीसह, तेलुगू, मराठी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली. १९६९ ते १९७२ या काळात लागोपाठ चार वर्षे त्यांना फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. ‘जहां प्यार मिले’ या चित्रपटातील ‘बात जरा है आपस की...’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरनेही गौरविण्यात आले होते. १९७० मध्ये रीलीज झालेल्या ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटासाठी त्यांनी गायन केले होते.