महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त १४ एप्रिलला "पाळणा" गीताचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी धनंजय मुंडे यांनी डॉ आंबेडकर जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच लहानपणीच मुलांनी बाबासाहेबांवरील हे "पाळणा" गीत ऐकून मोठी व्हावीत व चांगले नागरिक घडावित अशी सदिच्छा व्यक्त केली. हे गाणे बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या स्वरसाजात सजले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर सर्व देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे मार्गदर्शन घेतात ही बाब आपल्या सर्वांसाठी मोठया गौरव व सन्मानाची आहे आणि म्हणूनच आपण त्यांना विश्वरत्न म्हणतो असे मंत्री महोदयांनी संगितले. या कार्यक्रमा करिता ज्यांनी हे गीत लिहिलेले आहे ते गीतकार, संगीतकार राजेश ढाबरे साहेब, नार्कोटिक आयुक्त,सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कॉटिक्स हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते.
पाळणा गीता करिता आवाजात गोडवा व ममता असावी त्यामुळेच आजची श्रेष्ठ गायिका श्रेया घोषाल यांचे कडून हे गीत गाऊन घेण्यात आले असे राजेश ढाबरे यांनी सांगितले.
स्वयमदिप सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेच्या अधक्ष्या आयु. डॉ.भावना ढाबरे यांच्या कल्पकतेने, पुढाकाराने व सहयोगाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते व त्यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु.अजय चालखुरे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे संचालन प्रशांत ढाबरे यांनी केले.