आपल्या प्रत्येकाचं एक दैनंदिन आयुष्य हे ठरलेलं असत आणि आपण तसंच ते जगत असतो. पण एक दिवस मेघाच्या आयुष्यात एक अशी रंजक गोष्ट घडते ज्यामुळे तिचं दैनंदिन आयुष्य बदलून जाते. तिला सापडलेल्या एका नवीन वाटेला आणि स्वतःला ती अधिक प्राधान्य देते. आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच 'बटरफ्लाय' (Butterfly Movie). एका छोट्याश्या ठिणगीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होत ह्याची गोष्ट सांगणारा बटरफ्लाय हा चित्रपट येत्या २ जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील कोरी कोरी झिंग हाय गं असे रंजक शब्द असलेले गीत सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
बटरफ्लाय चित्रपटाच्या पोस्टरपासूनच चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढली आहे. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याला शुभाजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केले असून सुप्रसिध्द गायिका वैशाली भैसने माडे हिच्या सुमधुर आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी 'बटरफ्लाय' चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे. वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.