सहा फ्रेश चेहऱ्यांचे मराठीत होणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 11:20 AM
प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांच्या 'हॉस्टेल डेज' या १२ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची ...
प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांच्या 'हॉस्टेल डेज' या १२ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य भूमिकेतील प्रार्थना बेहेरेसह, अंकिता बोरा, सोनिया पटवर्धन, पूर्वा शिंदे , अंकिता लांडे, सागरिका रुकारी, पूर्वा देशपांडे या तब्बल सहा नवीन आणि फ्रेश चेहऱ्याच्या नायिका या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर चित्रपट पदार्पण करणार आहेत. यातील काहीजणी व्यावसायिक मॉडेल आहेत, काही कॉलेजात शिकत आहेत, तर काही इतर क्षेत्रातील उच्चशिक्षित आहेत.'हॉस्टेल डेज'मध्ये प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण खरी धमाल असणार आहे ती सहा नवीन मुलींच्या बेधडक अभिनयाची. अंकिता लांडे, सागरिका रुकारी, अंकिता बोरा, सोनिया पटवर्धन, पूर्वा देशपांडे आणि पूर्वा शिंदे या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट आहे. हॉस्टेलमध्ये या मुली धमाल करायला सज्ज झाल्या आहेत. चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.अंकिता बोरा ही चार्टर्ड अकाऊंटटचा अभ्यास करत आहे. अनेक स्टेज शोजमध्ये तिने अॅंकरींग केले आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके पटकावली आहेत. सोनिया पटवर्धन सध्या स.प. महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत आहे. तिची आई मृदुल पटवर्धन यांनी अजय नाईक यांच्या ‘लग्न पहावे करून’ आणि ‘बावरे प्रेम हे’मध्ये कोस्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे. सोनिया तेव्हा शाळेत होती आणि अजय यांनी त्याचवेळीच ठरवले होते की मोठी झाल्यावर तिला पदार्पणाची संधी द्यायची.पूर्वा शिंदे हीसुद्धा एक व्यवसायिक मॉडेल आहे. आणि तिने अनेक ब्रॅन्ड्ससाठी मॉडेलिंग केले आहे. ‘श्रावण क्वीन’ची अंतिम फेरी तिने गाठली होती. तिथेच तिची निवड नाईक यांनी केली. यातील अंकिता लांडे हि आयुर्वेदाची (BAMS) पदवी घेतेय आणि त्याचबरोबर ती एक व्यवसायिक मॉडेलही आहे. अनेक फॅशन शोजमध्ये रॅम्पवर अवतरली आहे. अनेक ब्रॅन्ड्स साठी मॉडेलिंग केले आहे. ‘श्रावण क्वीन’च्या अंतिम फेरीत तिला अजय नाईक यांनी हेरली आणी तिची निवड झाली.सागरिका रूकारी हिने साहित्यामधून बीए केले आहे. तीसुद्धा एक व्यवसायिक मॉडेल असून अनेक फॅशन शोजमध्ये तिने रॅम्प वॉक केला आहे. ती ‘श्रावण क्वीन’ची उप-विजेती होती. तिथेच तिची या चित्रपटासाठी निवड झाली. पूर्वा देशपांडे सध्या स.प. महाविद्यालयातच एफवायबीएला आहे. महाविद्यालयाकडून पोरुषोत्तम, फिरोदिया, दाजीकाका करंडक अशा स्पर्धांमध्ये तिने कामे केली आहेत. दाजीकाका करंडकचे आयोजक असलेल्या अजय नाईक यांनी तिचे काम पाहिले आणि तिला संधी दिली.या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे."हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीहि नॉस्टॅल्जिक होतोच," असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी काढले.