पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यांना गुलामगिरी स्वीकारावी लागली.याच विषयावर आधारित 'बलोच' (Baloch) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच ट्रेलर प्रदर्शित झाले. ट्रेलर पाहून रसिक प्रभावित झाले आहेत. अभिनेते प्रविण तरडेंनी (Pravin Tarde) सिनेमासाठी किती मेहनत घेतली हे ट्रेलरवरुन लक्षात येतं. तर प्रविण तरडेंच्या जोडीला अभिनेत्री स्मिता गोंदकरने (Smita Gondkar) भूमिका साकारली आहे.
'बलोच' सिनेमात स्मिता गोंदकरनेही अॅक्शन सीन्स दिले आहेत. यासाठी तिनेही प्रचंड मेहनत घेतली आहे. तलवारबाजी, लाठ्या, मर्दानी खेळ हे सर्व तिची मुळात आवड असल्याने ती करु शकली. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत स्मिताने खुलासा केला की तिचे पूर्वज हे बलुचिस्तानचे आहेत. ती म्हणाली,"आमची कुलदेवी हिंगुलंबिकामाताचं अजून तिथे मंदिर आहे. माझं मात्र आजपर्यंत तिथे जाणं झालेलं नाही. या सिनेमाच्या माध्यमातून जायचा योग येतो का बघुया."
ती पुढे म्हणाली,"मला कायम ऐतिहासिक भूमिका करायची इच्छा होती. अनेकदा मी काही दिग्दर्शकांसमोर सहजच ही गोष्ट बोलून गेले आहे. छोटीशी भूमिका करायचीही माझी तयारी होती. अचानक मला पूर्ण फिल्मच ऑफर झाली म्हणून मी खूप खूश आहे."
'बलोच'मध्ये प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या वितरणाचे काम फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांनी पाहिले आहे.