बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'नाच गं घुमा' सिनेमा १ मेला प्रदर्शित झाला. घरोघरी काम करणाऱ्या कामवाली बाईचं विश्व या सिनेमातून मांडण्यात आलं आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर बालकलाकार मायरा वायकुळही या सिनेमात झळकली आहे. मायराने या सिनेमात चिकू उर्फ सायलीची भूमिका साकारली आहे. मायराचा अभिनय पाहून मराठी अभिनेत्री थक्क झाली आहे.
'नाच गं घुमा'मधील मायराच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. मराठी अभिनेत्री स्नेहा वाघने मायरासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. स्नेहाने नुकताच 'नाच गं घुमा' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर स्नेहा भारावून गेली आहे. तिने मायराबरोबरचे फोटो शेअर करत तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. "तुझा गर्व आहे...अजून खूप पुढे जायचं आहे, बेबी गर्ल, अभिनंदन", असं स्नेहाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून मायरा घराघरात पोहोचली. या मालिकेतील परीच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर मायरा नीरजा एक नयी पहचान या हिंदी मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने स्नेहा वाघबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता ती 'नाच गं घुमा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा मायराचा पहिलाच चित्रपट आहे.
'नाच गं घुमा' सिनेमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, मायरा वायकूळ हे कलाकार आहेत. स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.