हिंदी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया डिसुझा - देशमुख (Genelia D'souza- Deshmukh) या जोडीने सर्वांना वेड लावले आहे. वेड (Ved Marathi Movie) या मराठी चित्रपटातून दोघेही चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातून रितेश पहिल्यादांच दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे आणि जिनिलिया या सिनेमातून मराठीत पदार्पण करते आहे. इतकेच नाही तर ती बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करते आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, त्यातील गाणी सगळ्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. वेडच्या निमित्ताने रितेश आणि जिनिलियानं लोकमतच्या पंचायतमध्ये हजेरी लावली होती. यावेळी जिनिलियाने इंडस्ट्रीत घेतलेल्या मोठ्या ब्रेकबद्दल खुलासा केला.
जिनिलिया देशमुख म्हणाली की, लग्नानंतर मला ते लाइफ एन्जॉय करायचं होतं. लग्नाआधी मी जवळपास १० वर्षे भरपूर काम केले होते. हिंदीच नाही तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीत काम केले होते. त्यामुळे लग्नानंतर मी ब्रेक घ्यायचा ठरवला. मला रितेशसोबत टाईम स्पेंड करायचा होता. त्यानंतर मला मुलं झाली. हा वेळ माझ्यासाठी होता. त्यामुळे जेव्हा मला वाटेल तेव्हा मी कालावधीनंतर कमबॅक करणार होते. त्यासाठी वयाची मर्यादा नसते. त्यामुळे मी मोठा ब्रेक घेतला. त्यानंतर मला रितेश म्हणाला की, बस्स झालं आता आराम..आता पुन्हा अभिनय कर. जेव्हा पण तू कमबॅक करशील तेव्हा ते मराठी चित्रपटातून कर. आता मी वेड चित्रपटातून कमबॅक करते आहे.
त्यावर रितेश म्हणाला की, हिंदी, तमीळ, तेलगू, मल्याळम आणि कर्नाटक या भाषेत जिनिलियानं काम केले आहे. मराठी आता सहावी भाषा आहे, ज्यात जिनिलिया काम करते आहे. मला ज्या भाषेत बोलता येतं ते म्हणजे हिंदी आणि मराठी त्यातच काम केले आहे. तेलगू, तमीळमध्ये कसं काम करायचं ते मला कळणार नाही. ही कला असते. तिथे जावून भाषा शिकणं आणि आत्मसात करणं. जिनिलियाचं जे साउथमध्ये करिअर शंकर, राजामौली, ए.आर. रहमान, अल्लू अर्जुन, रामचरण अशा बऱ्याच कलाकारांसोबत काम केले आहे. त्यामुळे तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
वेड चित्रपटाबद्दल रितेश म्हणाला की, वेड आपल्याला जगवायला आणि जगायला शिकवतं. प्रेमातला वेडेपणा यात पाहायला मिळेल. वेड चित्रपट ३० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.