मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभ्यासू आणि उत्तम अभिनय कौशल्य असलेला अभिनेता म्हणजे प्रविण तरडे (pravin tarde). आजवर त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते नेहमीच चर्चेत असतात. तसेच बऱ्याचदा ते त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. प्रविण तरडेंनी बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर आता ते साउथच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे.बोल भिडू या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रविण तरडे यांनी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.
एस.एस. राजामौलींच्या एका चित्रपटात प्रविण तरडे दिसणार आहेत. या चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रविण तरडे म्हणाले की, साउथच्या सिनेमात व्हिलन जास्त प्रसिद्ध होतात. मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. लवकरच याची घोषणा होईल.
सर्वात शिस्तप्रिय इंडस्ट्री
अनुभवाबद्दल प्रविण तरडे म्हणाले की, लोकांना सांगायला आनंद वाटेल की साऊथ सिनेइंडस्ट्री ही सर्वात शिस्तप्रिय इंडस्ट्री आहे. सकाळी ७ ची शिफ्ट असेल तर पहिला सीन पावणे सातला सुरू होऊन ७ वाजता ओके टेक असा आवाज आला पाहिजे. माझी जर सातची शिफ्ट असेल तर व्हिलनला तयारीसाठी अडीच तास लागायचे. त्यामुळे मला असिस्टंट डिरेक्टर साडे तीनला उठवायला यायचे. साडेतीनला उठून ४ ला मी गाडीत बसायचो. सव्वा चारला मेकअप व्हायचा. साडेसहाला पूर्ण तयारीत मी सेटवर हजर राहायचो. एवढी शिस्त मी कुठेच पाहिली नाही.
मराठीतील बरेच कलाकार साऊथमध्ये झालेत सेट
साउथ सिनेइंडस्ट्रीत जशी काम सुरु होण्याची अचूक वेळ असते तशी काम संपण्याची सुद्धा वेळ असते. शूटिंग वेळेत सुरु झाल्यावर ते वेळेतच संपायचे. काहीवेळा शूटिंग वेळेआधी संपले तर सरसकट पॅकअप सांगितले जाते. अशी साऊथ इंडस्ट्रीची शिस्त आहे. आपले मराठीतील बरेच कलाकार आज साऊथ सिनेइंडस्ट्रीत स्थिरस्थावर झाले आहेत. माझ्या या चित्रपटात सयाजी शिंदेदेखील आहेत.