कोणताही कलाकार विशेषत: अभिनेता त्याच्या कारकीर्दीत अशा एका भूमिकेच्या शोधात असतो जी भूमिका त्याच्या करिअरला वेगळी कलाटणी देणारी असेल. अभिनेता क्षितीश दाते याने धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे (Dharmaveer Movie) या सिनेमाच्या निमित्ताने हा अनुभव घेतला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्याचा प्रवास उलगडून दाखवणाऱ्या या सिनेमाची मोट बांधत असताना आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेले, त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांची भूमिका माझ्यासाठी फक्त भूमिका नव्हती तर तो एक अनुभव होता असं सांगत अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date)याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. झी टॉकीज वाहिनीवर २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हा सिनेमा घरी बसून पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.
धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाने अक्षरश: रेकार्डब्रेक कमाई केली. अजूनही या सिनेमाची चर्चा थांबलेली नाही. आता हा सिनेमा झी टॉकीज या वाहिनी वर दाखवला जाणार आहे . अभिनेता प्रसाद ओक या सिनेमात आनंद दीघे यांच्या भूमिकेत आहे तर क्षितीश दाते याने वठवलेली एकनाथ शिंदे यांचीही भूमिका खूप गाजली आहे. वर्ल्ड टेलीविजन प्रीमियरच्या निमित्ताने बोलताना क्षितिश म्हणाला, धर्मवीर सिनेमाचे निर्माते मंगेश कदम यांच्या डोक्यातील कल्पनेचं मूर्त रूप आहे. प्रवीण तरडे यांनी या सिनेमाला त्यांच्या दिग्दर्शनाचा असा काही टच दिला आहे की भट्टी जुळून येणं म्हणजे काय असतं ते या टीमने दाखवून दिलं. सिनेमाची स्क्रिप्ट, संवाद, मांडणी यापेक्षाही आव्हान होतं ते धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे अशा प्रमुख व्यक्तिरेखांचा लूक साकारणं. माझ्याकडे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेची ऑफर आली तेव्हा आनंद आणि टेन्शन अशा संमिश्र भावना माझ्या मनात तयार झाल्या. अभिनेता म्हणून खूप मोठी संधी माझ्या हातात होती. प्रसाद ओक आनंद दिघे साकारणार होते आणि मी एकनाथ शिंदे. हे जेव्हा ठरलं तेव्हा मी पहिल्यांदा प्रसाद ओकला माझ्या मनातील दडपण बोलून दाखवलं. हे मला जमेल का ? हा माझा प्रश्न होता. कारण एखादं काल्पनिक पात्र साकारणं आणि प्रत्यक्षात असलेली व्यक्ती भूमिका म्हणून सादर करणं यातील फरक मला नक्कीच माहित आहे. त्यामुळे खूप भीती वाटली. प्रसाददादाच्या मनातही आनंद दीघे यांच्या भूमिकेबाबत तेच दडपण होतं, पण जसा एकनाथ शिंदे यांचा लुक केला आणि एकेक संवाद, देहबोली, बाज यातून मी त्या भूमिकेत शिरलो तसा मी कधी त्यांच्यात एकरूप झालो हे मलाही समजले नाही.