दिवाळी या सणाला आता काहीच दिवस शिल्लक असून प्रत्येकजण या सणाची तयारी करत आहेत. या सणाला काय काय घ्यायचे हे अनेकांनी आधीच ठरवलेले असते. दिवाळी आणि शॉपिंग हे जणू एक समीकरणच आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठा, मॉल्स यांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. काही जण तर दिवाळीच्या कित्येक दिवस आधीपासूनच शॉपिंगला सुरुवात करतात. अभिनयक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांना तर त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून दिवाळी शॉपिंग करायला देखील अनेकवेळा वेळ मिळत नाही. पण तरीही सध्या वेळात वेळ काढून काही कलाकार सध्या शॉपिंग करत आहेत.
प्रेक्षकांची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने देखील दिवाळी शॉपिंगला सुरुवात केली आहे. तिने ही शॉपिंग कोणत्याही मॉल अथवा बाजारपेठेतून न करता एका वेगळ्याच ठिकाणाहून केली आहे. तिनेच खुद्द सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. तिने ट्विटरवर एक पोस्ट शेअर त्यात म्हटले आहे की, दिवाळीची शॉपिंग करणे हे नेहमीच खास असते. मी येरवाडा जेलमधील दिवाळी मेलाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. तिथे विकायला ठेवलेल्या सगळ्याच वस्तू या कैद्यांनी स्वतःच्या हाताने बनवल्या होत्या आणि त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रदर्शन एक आठवड्यासाठी लोकांसाठी खुले असणार आहे. तुम्ही देखील या प्रदर्शनाला भेट द्या आणि या वस्तू खरेदी करा... या कैद्यांना देखील तुमच्या सणाचा, समाजाचा भाग बनण्यास मदत करा आणि सगळीकडेच आनंद पसरवा... त्यांनी बनवलेल्या काही वस्तू तिने या पोस्ट सोबत शेअर देखील केल्या आहेत. तसेच येरवडा जेलमधील अधिकाऱ्यांसोबत काढलेला फोटो देखील तिने या पोस्टसोबत शेअर केला आहे.
'अप्सरा आली' म्हणत सोनाली कुलकर्णीने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवले आहे.