कलाविश्वाला धक्का देणाऱ्या दोन दु:खद बातम्या सलग दोन दिवस आल्या. काल प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आपल्या ND स्टुडिओतच गळफास घेत आत्महत्या केली. तर आज निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचंही निधन झालं. या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वाच्या जाण्याने मन सुन्न झालं. त्यांच्यासोबत ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं अशा अनेक सेलिब्रिटींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) 2012 साली आलेला 'अजिंठा' सिनेमा आठवत असेलच. नितीन देसाई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर कवी ना धों महानोर यांनी सिनेमातील गाणी लिहिली होती. या दोन्ही मोठ्या व्यक्तिमत्वासोबत काम करण्याची संधी सोनालीला मिळाली होती. आज दोघंही आपल्यात नाहीत. सोनालीने 'अजिंठा' सिनेमाच्या पत्रकार परिषदेदरम्यानचा एक फोटो अपलोड करत भावूक कॅप्शन लिहिले आहे.
सोनाली लिहिते, 'कालच्या धक्क्यातून अजून सावरता आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली…नितीन देसाईंनंतर… ना.धो.महानोर… हा असा कसा योगायोग ठरावा…! माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना धों महानोर आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या कलाकृती अजरामर राहतील. आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की. नितीन देसाई यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांच्या कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं.त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच…
पद्मश्री ना धों महानोर यांना अजिंठा या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं 'अजिंठा' नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं. रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या..घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील..भावपूर्ण श्रद्धांजली
नितीन देसाई आणि ना धों महानोर यांच्याबरोबर सोनालीने काम केल्याने तिच्यासाठी नक्कीच हे पचवणं अवघड आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान सोनालीची पोस्ट व्हायरल होत आहे.