कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बरीच महिने सिनेइंडस्ट्री ठप्प पडली होती. मात्र अनलॉक होताच हळूहळू सिनेसृष्टी स्थिरस्थावर होताना दिसते आहे. आता मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या काळात चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही निर्मात्यांनी परदेशाचा मार्ग अवलंबल्याचे पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी छूमंतर या मराठी चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग पार पडले. त्यानंतर आता आणखीन एका मराठी सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये होत आहे. ही माहिती या चित्रपटातील कलाकारांनीच दिली. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता हेमंत ढोमे लंडनमध्ये एका मराठी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत सांगितले की, कोव्हिडच्या लॉकडाउननंतर पहिलाच चित्रपट शूट करते आहे. माझी तर २०२०मधील पहिली फिल्म आहे आणि वर्ष संपण्याआधी ही संधी मिळाली. लोकेश विजय गुप्ते या एका अत्यंत हुशार नटाच्या दिग्दर्शनाखाली..माझा आवडता सहकलाकार हेमंत ढोमे. पुन्हा एक नवी सुरूवात.शुभारंभ
सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमेच्या या चित्रपटाच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. सोनाली व हेमंतने या चित्रपटापूर्वी पोश्टर गर्ल या चित्रपटात एकत्र काम केले आहे.