Join us

"माझी आई लग्न न झालेल्या, विधवा मैत्रिणींनाही बोलवायची", सोनाली कुलकर्णीने हळदी कुंकूबाबत मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:01 PM

सोनाली कुलकर्णी म्हणते, "मी पण हळदी कुंकू लावते, मला आवडतं"

मराठी सिनेसृष्टीबरोबरच बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनयाची छाप पाडून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'दिल चाहता है' असो किंवा 'डॉ. प्रकाश बाबा आमटे'...सोनालीने प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे वठवली. अभिनयाबरोबरच सोनाली तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. अनेकदा सोनाली तिची मतं परखडपणे मांडताना दिसते. आतादेखील एका मुलाखतीत तिने हळदीकुंकू कार्यक्रमाबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. 

सोनालीने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. महिलांच्या हळदीकुंकू बाबतही सोनालीने तिचं मत व्यक्त केल. हळदीकुंकवाचा महिल्यांच्या लग्नाशी काहीही संबंध नाही, असं सोनाली म्हणाली. "माझ्या आईने कायम हळदीकुंकूला तिच्या लग्न न झालेल्या आणि नवरा नसलेल्या(विधवा) मैत्रिणींनाही बोलवलं आहे. कारण, हळदीकुंकूचं उद्दिष्टच मुळात मैत्रिणींनो भेटुया, असं आहे.  नटूनथटून सौभाग्यवतींनी हळदीकुंकूला यावं, या उद्दिष्टाने मी पण हळदीकुंकू करत नाही", असं सोनालीने सांगितलं. 

पुढे ती म्हणाली, "मला तुला गजरा देवू दे, ओटी भरायला मिळू दे..हळदीकुंकू लावायला मिळू दे...मी हळदीकुंकू लावते. मला खूप छान वाटतं. यात धर्म, जात, मॅरिटल स्टेटस याचा संबंध नाहीये. पण ती कृती किती छान आहे. मला हळदीकुंकू लावणारे कितीतरी चेहरे माझ्या लक्षात आहेत. मी लावताना त्यांचे पाहिलेले चेहरे...कुणाच्या तरी डोळ्यांत आईने हळदीकुंकू लावल्याची आठवण असते. या किती अबोल गोष्टी आहेत". 

सोनालीने 'देऊळ', 'गुलाबजाम', 'अगं बाई अरेच्चा २', 'गारभीचा पाऊस', 'गुलमोहर' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'दिल चाहता है', 'सिंघम', 'कितने दूर कितने पास', 'अग्निवर्षा', 'टॅक्सी नं 9 2 11' या हिंदी सिनेमांमध्येही ती झळकली आहे. 'कच्चा लिंबू', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या सिनेमांमधील सोनालीने साकारलेल्या भूमिका गाजल्या. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी