Sonali Kulkarni : 'भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत', सोनाली कुलकर्णी स्पष्टच बाेलली...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:34 PM2023-03-16T16:34:33+5:302023-03-16T16:35:54+5:30
Sonali Kulkarni : काय म्हणाली सोनाली...? सोशल मीडियावर होतंय सोनालीचं कौतुक, व्हायरल होतोय व्हिडीओ...
सोनाली कुलकर्णीची (Sonali Kulkarni) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेेक मालिका, चित्रपटातील तिच्या सहजसुंदर अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिनं आपला ठसा उमटवला आहे. सध्या सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओत भारतीय मुली, लग्न आणि मुलींची मानसिकता यावर सोनालीने अगदी परखड मत मांडलं आहे.
भारतातील खूप मुली आळशी आहेत, असं सोनाली या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. सोनालीचा हा व्हिडीओ दोन आठवड्यांपूर्वीचा आहे.
I don't know who she is but hats off to her courage to speak the unspoken unpalatable truth! 👏#Equalitypic.twitter.com/vB2zwZerul
— Amit Srivastava 🕉️ (@AmiSri) March 15, 2023
काय म्हणाली सोनाली...?
'भारतातील बहुतांश मुली आळशी आहेत. त्यांना चांगली नोकरी असलेला, गाडी बंगला असलेलाच नवरा व बॉयफ्रेन्ड हवा. पण त्या मुलींमध्ये स्वतःमध्ये कमवण्याची हिंमत नसते. मी तुम्हा सर्वांना एक आवाहन करू इच्छिते, तुमच्या घरात अशा सक्षम मुली, महिला निर्माण करा जिच्यामध्ये स्वतःसाठी कमवण्याची क्षमता असेल. घरात नवा फ्रिज घ्यायचा ना, मग अर्धे पैसे तू दे, अर्धे मी देते, असं ती नवऱ्याला सांगू शकली पाहिजे. मला यावरून कोणत्याही घरात भांडणं लावायची नाहीत. महिलेनं सक्षम व्हायला हवं, एवढीच माझी इच्छा आहे, असं सोनाली या व्हिडीओत म्हणतेय.
मुलांवर प्रचंड दबाव...
पुरूषांवरच्या दबावाबद्दलही ती बोलली. यावेळी तिने आपल्या नवऱ्याचंही उदाहरण दिल. ती म्हणाली, मुलं १८ वर्षांची झाल्यावर त्यांच्यावर दबाव येतो. आता कमावायचं आहे, कुटुंबाला हातभार लावायचाय हाच एक विचार त्यांच्या मनात असतो. हे पाहून मला त्या सर्वांसाठी खूप वाईट वाटतं. माझा नवरा २० व्या वर्षी नोकरीला लागला आणि पैसे कमवू लागला. का? मुली तर २५-२७ वर्षांच्या होईपर्यंत काय करायचंय नुसता याचाच विचार करत असतात. बॉयफ्रेन्डवर दबाव टाकताना दिसतात. हनिमून भारतात नको परदेशात हवं, असा त्यांचा हट्ट असतो. आता तर डेस्टिनेशन वेडिंग्स, प्री-वेडिंग सगळं आलंय आणि त्याचा खर्चही त्या मुलानं करायचा असतो. असं का? तुम्हाला हा सगळा थाट, ऐशोआराम हवा असेल तर तुम्हीही कमावायला हवं. तुम्हीही शिका, चार ऑफिसमध्ये जा, कामासाठी विचारा, पण असं होत नाही. मुलींनीही जबाबदारी घ्यायला हवीये. सरसकट सगळ्या मुली अशा नाहीत, हे मला माहितीये. परंतु अशा अवास्तव मागणी करणाऱ्या मुलींची संख्या वेगानं वाढत आहे. बिलं भरणं, हे फक्त तुमच्या नवऱ्याचं काम नाही. पुढचे सहा महिने सगळ्या व्यापातून तुला सुट्टी आहे, असं कधीतरी नवऱ्याला म्हणा आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहा, असंही ती म्हणाली.