Join us  

परीक्षांनी सिनेमांना लावला ब्रेक!

By संजय घावरे | Published: March 19, 2023 2:35 PM

दरवर्षी परीक्षा आल्या की मराठी सिनेमे बॅकफुटवर जातात. याला यंदाचे वर्षही अपवाद नाही. या वर्षाच्या सुरुवातीला 'वेड'ने धडाकेबाज बिझनेस केल्यानंतर ३ मार्चला 'रौंदळ' रिलीज झाला असून, २२ मार्चला 'फुलराणी' होणार आहे.

संजय घावरे 

मुंबई - मार्चमध्ये रिलीज झालेला 'तू झूठी मै मक्कार' एकीकडे १०० कोटींच्या उंबरठ्यावर आहे, तर दुसरीकडे या महिन्यात एकच मराठी सिनेमा प्रदर्शित झाला असून, दुसरा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मार्चमधील परीक्षांच्या काळात यंदाही निर्मात्यांनी चित्रपट रिलीज करण्याचे धाडस न केल्याने पुन्हा एकदा परीक्षांनी मराठी सिनेमांना जणू ब्रेक लावला आहे.

दरवर्षी परीक्षा आल्या की मराठी सिनेमे बॅकफुटवर जातात. याला यंदाचे वर्षही अपवाद नाही. या वर्षाच्या सुरुवातीला 'वेड'ने धडाकेबाज बिझनेस केल्यानंतर ३ मार्चला 'रौंदळ' रिलीज झाला असून, २२ मार्चला 'फुलराणी' होणार आहे. ग्रामीण भागात धुमाकूळ घालत 'रौंदळ'ने जवळपास ८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, तर प्रेक्षकांना 'फुलराणी'चे आकर्षण आहे. २०२२ मध्ये फेब्रुवारीत १३, तर एप्रिलमध्ये ९ मराठी सिनेमे रिलीज झाले होते, पण मार्चमध्ये केवळ दोनच चित्रपट आले होते.

२०२१ मध्ये कोरोनाची झळ बसूनही फेब्रुवारीत ५ मराठी सिनेमे रिलीज झाले होते. त्यानंतर थिएटर्सच बंद होती. एकूणच परीक्षांच्या काळात मराठी रसिक सिनेमांकडे पाठ फिरवत असल्याने मराठीच नव्हे, पण कोणतेही मोठे हिंदी चित्रपटही रिलीज होत नसल्याचे चित्रपट तज्ञ्जांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागांमध्ये परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याकडे पालक-विद्यार्थ्यांचा फोकस असतो. त्यांचा बराच वेळ प्रवासात जातो. घरातील संपूर्ण वातावरणच परीक्षामय असते. गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत महाराष्ट्रात विविध ठिकाणी जत्रा असतात. त्यापूर्वी परीक्षा संपवण्याकडे कल असतो. त्यामुळे गुढीपाडव्यापूर्वी सिनेमा रिलीज करण्याकडे निर्मात्यांचाही कल नसतो. गुढीपाडव्यानंतर शेतीची कामेही बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने शेतकरीही रिकामा असतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर सिनेमागृहांमध्ये पुन्हा सिनेमांच्या उड्या पडतात. यंदा एप्रिलमध्ये सहा मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत.

मार्च २०२१ - एकही नाहीमार्च २०२२ - १४३, झटकामार्च २०२३ - रौंदळ, फुलराणी

हॅालिवूडपटांचीही माघार

कोरोनापूर्वी मार्चमध्ये हॅालिवूडपट भारतात रिलीजसाठी प्रयत्न करायचे, पण या काळात रिलीज झालेल्या चित्रपटांना फटका बसल्याने ते देखील मार्चमध्ये भारतात सिनेमे रिलीज करायला धजावत नाहीत. मागच्या वर्षी 'फास्ट अँड फ्युरिअस ७' या चित्रपटानेही मार्चमध्ये रिलीज करणे टाळले होते.

हिंदी चित्रपटही थंडावले

या आठवड्यात रिलीज झालेल्या 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॅार्वे'ने पहिल्या दिवशी १.२७ कोटी, तर 'झ्विगाटो'ने केवळ ४२ लाखांचा गल्ला जमवला आहे. पुढल्या आठवड्यात कोणताही मोठा हिंदी चित्रपट रिलीज होणार नसून, ३० मार्चला अजय देवगणचा 'भोला' येणार आहे.

- विक्रम भोसले (शाहू सिनेमागृह, कोल्हापूर)

मार्चमध्ये कमी मराठी सिनेमे रिलीज होत असल्याने सिनेमागृहांचे आर्थिक गणित कोलमडते, कलेक्शन घटल्याने नुकसान होतेच, पण इतर भाषेतील सिनेमे सुरू असतात. कंटेंट चांगला असेल तर तो कधीही चालतो. वर्षभराचे प्लॅनिंग करून चांगल्या कंटेंटचे चित्रपट या काळात यायला हवे. परीक्षा संपल्यावर सिनेमांची लाट येते व शोज मिळणे अवघड होते.

- समीर दीक्षित (वितरक, पिकल एन्टरटेन्मेंट)

परीक्षांमुळे घरातील वातावरण अभ्यासमय असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकही मनोरंजनाकडे पाठ फिरवतात. परीक्षांसोबतच दरवर्षी गणपती आणि पावसाळ्यात असेच काहीसे वातावरण असते. त्यामुळे मराठी निर्माते चित्रपट रिलीज करायला धजावत नाहीत. यंदाही दोन मोठ्या चित्रपटांपैकी 'रौंदळ' रिलीज झाला आहे आणि 'फुलराणी' येणार आहे.

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडहॉलिवूड