Join us

सातव्या पुणे लघुपट महोत्सवात “स्पेशल डिश” "ठरली सर्वोत्कृष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2017 5:23 AM

सातव्या पुणे लघुपट महोत्सवात शिवदर्शन साबळे दिग्दर्शित “स्पेशल डिश” हया लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटासहित एकूण तीन पुरस्कार पटकाविले. सर्वोत्कृष्ट लघुपटाबरोबरच ...

सातव्या पुणे लघुपट महोत्सवात शिवदर्शन साबळे दिग्दर्शित “स्पेशल डिश” हया लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटासहित एकूण तीन पुरस्कार पटकाविले. सर्वोत्कृष्ट लघुपटाबरोबरच दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांना दिग्दर्शनाचा दुसरा पुरस्कार मिळाला तर याच लघुपटासाठी निकीता गिरीधर आणि हेमराज साबळे यांना सर्वोत्कृष्ट पटकथालेखनाचा पुरस्कार मिळाला. सदर महोत्सवात विविध देशांतील शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात आले. यापैकी सर्वोत्कृष्ट तेरा लघुपटांना विविध विभागांमध्ये पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी “स्पेशल डिश” ला तीन पुरस्कार मिळाले.“स्पेशल डिश” हया लघुपटाची निर्मिती शिवदर्शन साबळे व अजित पाटील यांनी ‘मॅजिक अवर क्रिएशन’ व ‘वीर क्रिएशन’ हया बॅनरखाली केली आहे. हया लघुपटाचे दिग्दर्शन शिवदर्शन साबळे यांनी केले असून कथा, पटकथा व संवाद निकिता गिरीधर व हेमराज साबळे यांनी लिहिले आहेत. संगीत अनुराग गोडबोले यांनी दिले असून संकलन अपूर्वा मोतीवाले सहाय व आशिष म्हात्रे यांनी केले आहे. यात अभिजीत साटम व मनवा नाईक यांच्या प्रमुख भुमिका आहेत.प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेला तरुण निर्माता व दिग्दर्शक शिवदर्शन साबळे हयानंतर “लगी तो छगी” हया चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा आगळा वेगळा विषय घेऊन येत आहे. शिवदर्शन साबळे हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू व संगीतकार देवदत्त साबळे हयांचे सुपुत्र. शिवदर्शन साबळे यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा संगीताचा वारसा तर घेतलाच आहे त्याशिवाय लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीक्षेत्रातही फार मोठी झेप घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या ‘कॅनव्हास’, ‘रंग मनाचे’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ हया चित्रपटातून दिग्दर्शनक्षेत्रातील निपुणता सिद्ध केली आहे. चित्रपटांबरोबरच त्यांनी “परंपरा डॉट कॉम”, “मी आणि ती” व “तळ्यात मळ्यात” हया नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करून आपले रंगमंचीय कसब जगाला दाखवून दिले आहे. “मॅजिक अवर क्रियेशन्स” आणि “वीर क्रियेशन्स” हया बॅनरखाली बनत असलेल्या “लगी तो छगी” हया चित्रपटाची निर्मिती निर्माते शिवदर्शन साबळे, अजित पाटील, दिप्ती विचारे, स्वाती फडतरे यांनी केली असून कथा, पटकथा व संवाद शिवदर्शन साबळे व हेमराज साबळे यांचे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवदर्शन साबळे स्वत: करीत असून चित्रपटाला संगीत देवदत्त साबळे आणि अनुराग गोडबोले यांनी दिले आहे. यात अभिजीत साटम, निकिता गिरीधर, मिलिंद उके, रविंदर बक्षी, राजु बावडेकर, सागर आठलेकर, आसित रेडीज, शैला काणेकर, योगेश सोमण, सुरेन्द्र पाल, महेश सुभेदार यांच्या प्रमुख भुमिका आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.