Join us

'टकाटक २'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; अनेक सिनेमागृहांवर झळकला हाऊसफुल्लचा बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 8:11 PM

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 'टकाटक २' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 'टकाटक २' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॅाक्स आॅफिस गाजवणाऱ्या 'टकाटक'चा सिक्वेल असलेल्या 'टकाटक २'बाबत असणारी उत्सुकता प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. टिझर, ट्रेलर आणि गाणी यांनी केलेल्या वातावरण निर्मितीमुळे 'टकाटक २' पाहण्यासाठी तरुणांसोबतच तरुणी आणि वयस्कर मंडळीही गर्दी करत असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. 'आता आणखी मोठा झालाय...' असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'टकाटक २' अॅडल्ट-कॅामेडी असूनही त्यातील महत्त्वपूर्ण संदेश भावत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत. यामुळे चित्रपट न पाहिलेल्या प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे. अॅडल्ट कॅामेडी असल्यानं झालेला काहींचा गैरसमज दूर करण्यात चित्रपटानं 'टकाटक' यश मिळवलं आहे.

एका सुरेख संकल्पनेवर आधारलेल्या या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केलं असून, त्यांनी पुन्हा एकदा विनोदाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत मार्मिक विचार पोहोचवण्याचं काम केलं आहे. पटकथेच्या मुद्देसूद मांडणीला किरण बेरड आणि संजय नवगिरे यांच्या प्रसंगानुरूप संवादलेखनाची साथ ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. तरुणाईसाठी बनवण्यात आलेल्या या चित्रपटात त्यांच्या अंगवळणी पडलेली भाषा वापरण्यात आली आहे. अॅडल्ट कॅामेडी असूनही बिभत्सतेला थारा दिला जाणार नाही याची योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणांच्या जोडीला तरुणीही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मैत्रींणींचे ग्रुपच्या ग्रुप एकत्र बुकींग करून चित्रपटाचा आनंद लुटत आहेत. इतकंच नव्हे तर डबल मिनिंग संवादांवरही मनमुराद हसत आहेत. पुरुषांच्या जोडीला महिला वर्गही हा चित्रपट एन्जॅाय करत असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे. मैत्री, आकर्षण, प्रेम, हेवेदावे, डान्स, मस्ती, धमाल, गाणी यांसोबतच दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्यानं सर्व वयोगटातील रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे.

यासोबतच 'दे टकाटक, घे टकाटक...' हे टायटल साँग आणि 'लगीनघाई...' या गाण्याच्या तालावर सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक ठेका धरून नाचत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सिनेमागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर काहीतरी समाधानकारक पाहिल्याचे भाव आणि स्मित हास्य पहायला मिळत आहे. 'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक २'देखील पुन्हा एकदा तिकिट खिडकीवर चमत्कार करणार असल्याचे संकेत देण्यासाठी हे चित्र पुरेसं आहे. फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानं या चित्रपटाला लाभलेल्या मोठ्या वीकेंडचा निश्चितच फायदा होईल असं मत चित्रपट व्यवसायतज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

कलाकारांचा अभिनय सर्वात मोठा प्लस पॅाइंट आहे. प्रथमेश परबनं साकारलेल्या ठोक्याला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतलं आहे. प्रथमेशनं कॅामेडीसोबतच इमोशनल सीन्सही मोठ्या ताकदीनं केले आहेत. अजिंक्य राऊतनं साकारलेला शऱ्या आणि अक्षय केळकरनं वठवलेला चंदू हसवतातही आणि भावूकही करतात. भूमिका कदम आणि प्रथमेशची केमिस्ट्री छान जुळली आहे. अंकिताच्या भूमिकेत कोमल बोडखेनं जीव ओतला आहे. प्रणाली भालेरावनं बोल्ड भूमिकेला सुरेख अभिनयाची जोड दिली आहे. या सर्वांमध्ये छोट्याशा भूमिकेत सुशांत दिवेकरनं अधून मधून चौकार-षटकारांची आतषबाजी केली आहे. विद्यार्थ्यांना समजून घेऊन सुधारण्याची संधी देणाऱ्या प्राध्यापकाची भूमिका पंकज विष्णूनं लीलया साकारली आहे. स्मिता डोंगरे यांनी प्रथमेशच्या आईच्या भूमिकेत लक्षवेधी अभिनय केला आहे. स्वप्नील राजशेखर यांनी साकारलेला मुख्याध्यापक काही ठिकाणी रहस्यमय वाटतो. आध्यात्मिक विचारसरणीच्या चंदूच्या वडीलांची भूमिका किरण माने यांनी साकारली आहे. याशिवाय तुषार माने, ऋषी मच्छे, अक्षय जाधव, मयुरी आव्हाड, किरण बेरड, आरजे महेश काळे यांनीही सुरेख साथ दिली आहे. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन करणारा आहे.

कॅमेरावर्क, कॅास्च्युम, लोकेशन्स, कला दिग्दर्शन, संकलन या तांत्रिक बाबीही कथानकाला पूरक आहेत. गीतकार जय अत्रे यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे. सिनेमॅटोग्राफर हजरत शेख वली यांनी सुंदर केलेलं छायालेखन खिळवून ठेवणारं असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. 'टकाटक २' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओनं, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगानं केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी, नरेश चौधरी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

टॅग्स :टकाटकसिनेमा