व्हायोलिनवादक म्हैसूर बंधूंची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2016 12:28 PM
प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, आपली कला सादर करण्यासाठी आपल्याला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे व्यासपीठ मिळावे. असेच स्वप्न ...
प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, आपली कला सादर करण्यासाठी आपल्याला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे व्यासपीठ मिळावे. असेच स्वप्न व्हायोलिनवादक म्हैसूर बंधूं यांचेदेखील होते. ते म्हणतात की, जगभरात आम्ही सर्वत्र कलाविष्कार सादर केला. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये आमचा सहभाग असावा यासाठी यापूर्वी दोनदा प्रयत्न झाले होते. मात्र, त्या वेळी परदेशात असल्याने आमची ही संधी हुकली होती. मात्र या आनंदमय महोत्सवात ही कला सादर करण्याची संधी मिळाले हे आमचे भाग्य आहे. तसेच आमचे वडील प्रा. महादेवप्पा हे कर्नाटकातील ज्येष्ठ व्हायोलिनवादक. घरातच गुरु लाभल्यामुळे व्हायोलिनवादन करणार हे गृहीतच होते. आम्ही दोघेही गेल्या ३६ वर्षांपासून एकत्र व्हायोलिनवादन करीत आहोत, अशी माहिती या बंधूंनी दिली. आमच्यबरोबरच बहीण रूपा हिनेसुद्धा व्हायोलिनवादनाचे शिक्षण घेतले असून ती म्हैसूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करते, असे ५६ वर्षांचे ज्येष्ठ बंधू नागराज यांनी सांगितले. मंजुनाथ ४७ वर्षांचे आहेत. मंजुनाथ संगीतामध्ये येण्यापूर्वी मी वडिलांसमवेत आणि नंतर आम्ही तिघांनीही व्हायोलिन सहवादन केले आहे. माझा २४ वर्षांचा मुलगा कार्तिक आणि मंजुनाथ यांचा १६ वर्षांचा मुलगा सुमंत हे दोघेही व्हायोलिन सहवादनाच्या मैफिली करीत आहेत, ज्युनियस म्हैसूर अशी त्यांची ख्याती असल्याचे, नागराज यांनी सांगितले. तसेच आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शुक्रवारी गायन-वादन आणि नृत्य असा त्रिवेणी संगम रसिकांनी अनुभवला. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य ब्रजेश्वर मुखर्जी यांच्या गायनाने सत्राचा प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ. म्हैसूर नागराज आणि म्हैसूर मंजुनाथ यांच्या व्हायोलिन सहवादनाची मैफील झाली. पूर्वाधनश्री यांच्या भरतनाटयम नृत्यानंतर पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने तिसºया सत्राची सांगता झाली.