'लोकमत'ची निर्मिती असलेली 'परस्पेक्टिव्ह' ही शॉर्टफिल्म सोशल मीडियावर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या लघुपटातून अभिनेता आदिनाथ कोठारेने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या शॉर्टफिल्मला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावून गेल्याचं आदिनाथ सांगतो.
सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय?, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय?, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे.या प्रतिसादाबाबत आदिनाथने सांगितले की, 'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही शॉर्टफिल्म प्रदर्शित झाल्यानंतर मला इंडस्ट्रीतील व इतर लोकांचे फोन आले. त्यांना या लघुपटाची कन्सेप्ट खूप आवडल्याचे सांगितले. त्यामुळे मी खूप खूश आहे. जेव्हा आपण एखादी कलाकृती करतो आणि त्याला खूप चांगली दाद मिळते. तेव्हा पुढील कामासाठी आणखी हुरूप मिळतो. 'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्ममध्ये दाखवण्यात आलेल्या विषयाचा प्रत्यक्ष अनुभव आदिनाथने घेतला आहे. याबाबत सांगताना तो म्हणाला की, 'मी मुंबईत गाडी चालवत असताना गणपतीची विसर्जन मिरवणूक वाजत-गाजत निघाली होती. त्याचवेळी समोरच्या रस्त्यावरून एका मुस्लीम व्यक्तीची अत्यंयात्रा जात होती. ते दृश्यं पाहून मनात शंकाकुशंकांचं काहुर माजलं. आता काय होणार?, असा मोठ्ठा प्रश्न पडला. त्यानंतर जे घडले ते पाहून मला भारतीय असल्याचा अभिमान वाटला. आजची जनता खूप हुशार आहे. त्यामुळे ते कोणताही भेदभाव मानत नाहीत. धर्म व जातीच्या नावावर कोण फायदा घेतं, हे त्यांना माहीत आहे. लोकांना एकमेकांसोबत मिळून मिसळून राहायला आवडते, असे लघुपटाचा सहनिर्माता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने सांगितले. या लघुपटाला जगभरातील दहा फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरवण्यात आले आहे.